
Mumbai Local Train Blast Case: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी असलेल्या व्यक्तींची उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. उच्च न्यायालयाच्या या निकालाचे सर्वत्र जोरदार पडसाद उमटले. या बॉम्बस्फोटात ज्या निरपराध मुंबईकरांचं आयुष्य उद्धवस्त झालं त्या पीडितांच्या नातेवाईकांनी या निर्णयावर निराशा व्यक्त केली. राज्य सरकारनं देखील या निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. राज्य सरकारनं दोषी व्यक्तींना शिक्षा देण्यासाठी नव्यानं तयारी सुरु केलीय. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
'2006 साली जो बॉम्बस्फोट झाला त्यात ज्यांचा काहीही संबंध नव्हता, असे निरपराध लोकही अडकले, आणि काही लोकांचा मृत्यू झाला', असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. उच्च न्यायालयाचा जो निकाल आला, तो निकाल देण्याचा न्यायालयाला अधिकार आहे. याबद्दल आम्हाला काहीही म्हणायचे नाही. पण सरकारने अपील करण्याचे ठरवले आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि तिथे न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू.
न्यायालयाच्या अधिकाराबद्दल मला जास्त काही बोलायचे नाही. आमचे उत्तम वकील आम्ही तिथे (सर्वोच्च न्यायालयात) देऊ. उच्च न्यायालयात काय उणिवा राहिल्या, त्या शोधण्याचा प्रयत्न करू. आम्ही तिथे सर्वात चांगले वकील देऊ.
( नक्की वाचा : Mumbai Local Train Blast: मुंबई लोकल स्फोट प्रकरण: 11 आरोपींच्या निर्दोष सुटकेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती )
पण आम्हाला हे देखील सांगायचे आहे की, कोणावरही अन्याय होऊ नये. मात्र, जे दोषी आहेत त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. आम्ही कोणाच्याही विरोधात नाही आणि आम्हाला विरोधात असण्याची गरजही नाही, पण आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही, असं अजित पवारांनी सांगितलं.
अजित पवारांचं वक्तव्य का महत्त्वाचं?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. 2006 मध्ये मुंबई झालेल्या बॉम्बस्फोटातल्या आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात फडणवीस सरकार सुप्रीम कोर्टात गेलं आहे. अजित पवार मात्र म्हणतात, काही निष्पापांना फसवलं गेलं.
2006 साली हा बॉम्बस्फोट झाला त्यावेळी अजित पवार सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. आताच्या सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. या मग सरकार निर्दोष मुक्ततेविरोधात सुप्रीम कोर्टात का? काही निष्पापांना फसवलं गेलं तर अजित पवार गप्प का राहिले? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world