जाहिरात

Ajit Pawar News: तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय... Love U दादा!, रोहित पवारांची पोस्ट वाचून रडू आवरणार नाही

Ajit Pawar News: राशपचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केलीय.

Ajit Pawar News: तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय... Love U दादा!, रोहित पवारांची पोस्ट वाचून रडू आवरणार नाही
"Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्यासाठी रोहित पवार यांची खास पोस्ट"
PTI And Rohit Pawar Insta

Ajit Pawar News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त सर्वांसाठीच हादरवणारे होते. लाडके काका आता या जगात नाहीत, हे सत्य रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनाही मान्य करणं अतिशय जड जातंय. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे निधन झाले. त्यावेळेस रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या अश्रूंचा बांध फुटला. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर लाडके काका अजित पवार यांच्यासाठी भावुक पोस्ट शेअर केलीय.  नेमके काय लिहिलंय सविस्तर जाणून घेऊया...

रोहित पवार यांची अजित पवार यांच्यासाठी खास पोस्ट

मा. अजितदादांनी जिथे विकासरुपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल, असं कधी स्वप्नातही आलं नाही.. पण नियतीच्या क्रूर खेळापुढं कुणाचं काही चालत नाही.. अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुत्र आहे... मन बर्फाप्रमाणे थिजलंय.. काय झालं, कसं झालं आणि का झालं, या विचाराचं मनातलं काहूर थांबत नाहीय... आपल्यात आत्तापर्यंत जे-जे काही संभाषण झालं, चर्चा झाल्या, विशेषतः शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा, हे सगळं काही एखादा टेपरेकॉर्डप्रमाणे सारखं सारखं कानात घुमतंय. जणू काही तुम्हीच अदृश्य स्वरुपात बोलत आहात असा भास होतोय. तुमची ती काम करण्याची शैली, प्रशासनावर पक्की मांड, राजकारणावर मजबूत कमांड, परखड स्वभाव, हो ला हो आणि नाही ला नाही न करता जे असेल ते स्पष्ट सांगून समोरच्या व्यक्तीसोबत राजकारण न खेळण्याची पद्धत, कामाचा झपाटा, वेळेचं काटेकोर नियोजन या सगळ्याचं आम्हाला अक्षरशा कौतुक आणि आश्चर्यही वाटायचं. 

(नक्की वाचा: Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांचा अपघात की घातपात? लोकांच्या मनातील कलह दूर करावा: विजय वडेट्टीवार)

सत्ता असो किंवा नसो, कायम तुमचा दरारा वाटायचा, आदरयुक्त भिती असायची. तुमचा सार्वजनिक वावर बघून तुम्हाला न भेटलेल्या अनेकांना तुम्ही फणसाप्रमाणे कठोर वाटायचात पण तीच व्यक्ती जेव्हा तुमच्या संपर्कात यायची तेव्हा फणसातील रसाळ आणि मधुर गऱ्याप्रमाणे तुमचा स्वभाव पाहून ती तुमच्या प्रेमात पडायची, याचे आम्ही साक्षीदार आहोत. पण अचानक असं काय झालं? दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, दररोज भेटणाऱ्या शेकडो माणसांना मदत करणारा, त्यांची कामं करणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचाच ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगाने उर फाटेस्तोवर धावणारा पहाडासारखा माणूस असा एका क्षणात कसा निघून जाऊ शकतो? या प्रश्नाने डोक्याचा भुगा झालाय. पण काही प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात, असं म्हणतात.  

(नक्की वाचा: NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाची घोषणा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर होणार होती,राजेश टोपेंचा मोठा दावा)

पण मा. अजितदादांच्या विकासाचा वेगच कदाचित नियतीला आवडला असावा आणि म्हणूनच अजितदादा लोकांसाठी धावत असतानाच त्याच वेगाने नियतीने त्यांच्यावर झडप घातली असावी. या नियतीबाबतच माझी तक्रार आहे.. ती कुठं करायची हे कळत नाही. पण माझा त्या नियतीला प्रश्न आहे, "आमच्यासारखे लाख नेले असते तरी चाललं असतं, पण आमचा लाखांचा पोशिंदा तू का असा चोरून नेला? एका क्षणात तू लाखो जणांच्या लाखो स्वप्नांची राख का केलीस. दे ना उत्तर."

अजितदादा तुमच्याविषयी देखील माझी तकार आहे. दोन दिवसांपासून महाराष्ट्र अक्षरशः स्तब्ध आहे.. प्रत्येकाच्या डोळ्यांतला अश्रूचा पूर कमी होत नाहीये.. हुंदके आणि आक्रोश ऐकून काळजात चर्रर्र होतंय. आपल्या जाण्याने पाठीमागे दुःखाचे असे पाट वाहतील, याची चिंता दादा तुम्ही का केली नाही? एरवी कुणी थोडं जरी चुकलं तर त्याला चार चौघात झाप झाप झापणारे तुम्ही त्या नियतीलाही त्याच जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं? महाराष्ट्राची अजून कित्येक कामं बाकी असताना वेळ न घेता तू अशी आलीच कशी? दादा, तुमचा आवाज ऐकूनच ती नक्की घाबरली असती. पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही. मोकळ्या हाताने तिलाही माघारी पाठवलं नाही. आलेल्या प्रत्येकाचं काम करायचं, हेच तर तुमचं वैशिष्ट्य होतं. पण दोन दिवसांपासून दुःखाच्या पुरात आकंठ बुडालेला महाराष्ट्र पाहून आता त्या नियतीलाही नक्कीच पश्चात्ताप होत असेल.

(नक्की वाचा: Ajit Pawar: अजित पवारांची खाती कोणाला मिळणार? सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? सर्वांचे शरद पवारांकडे लक्ष)

दादा काय बोलू? आज तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतूनही अचानक त्याच रुबाबात उभं रहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल, "अरे वेड्यांनो, का अश्रू ढाळताय? मी तुमची गंमत करत होतो? एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची तुमची किती तयारी आहे हे 'मॉक ड्रील'प्रमाणे चेक करत होतो.. आता उठा, कामाला लागा. महाराष्ट्रासाठी, इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला खूप काम करायचंय.. चला, उशीर नका करू..."
दादा... कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय...
Love U दादा!

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com