Ajit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक असलेले खासगी वाहनचालक शामराव मणवे यांनी अपघाताच्या आदल्या रात्रीची माहिती नसलेली गोष्टी सांगितलीय. अपघाताच्या आधीच्या रात्री अजित पवार यांच्या प्रवासाची योजना कशी बदलली? याचा खुलासा मणवे यांनी केला.
"दादा शिस्तीचे फार कट्टर होते"
शामराव मणवे यांनी सांगितलं की, "मी वर्ष 2009पासून अजितदादा पवार यांच्यासोबत आहे. आधी मी शासकीय सेवेत होतो आणि वर्ष 2013मध्ये निवृत्त झाल्यानंतर मागील 12 वर्षांपासून खासगी स्वरूपात त्यांच्याकडे काम करत आहे. दादा वेळेचे फार काटेकोरपणे पालन करत आणि स्वच्छतेकडेही खूप लक्ष द्यायचे. जर त्यांनी सकाळी 6 वाजता तयार राहायला सांगितले, तर आम्ही सर्व पहाटे 5.30 वाजताच तयार असायचो. लोकांना वाटते की ते खूप कडक स्वभावाचे होते, पण ते चुकीचे आहे. ते फक्त कट्टर शिस्तीचे होते, कोणालाही कारणाशिवाय उगाच काहीही बोलायचे नाही.”
(नक्की वाचा: Ajit Pawar Photos: काश वेळ थांबली असती तर... जय पवारांनी वडील अजित पवारांसोबतचे खास फोटो केले शेअर)
"मीटिंगमुळे उशीर झाला…"
अपघाताच्या आदल्या रात्रीबाबत सांगताना शामराव मणवे म्हणाले की, "मंगळवारी कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर ठरले होते की आम्ही रस्तेमार्गाने पुण्याला आणि मग बारामतीला प्रवास करणार होतो. सकाळी 10 वाजता बारामतीत सभा ठरलेल्या होत्या. आमच्या शंकरने गाडीत बॅगही ठेवून दिल्या होत्या. 99 टक्के ठरले होते की आम्ही गाडीनेच प्रवास करणार. पण मीटिंगमुळे रात्री खूप उशीर झाला. त्यामुळे शेवटच्या क्षणी निर्णय बदलला आणि सकाळी थेट विमानाने बारामतीला जाण्याचे ठरले. दादांनी मला सांगितले की तू उद्या गाडी घेऊन पुण्याला ये आणि मी बारामतीहून पुण्याला येतो."
अजित पवार यांच्या मदत करण्याच्या स्वभावाबाबत ते म्हणाले,"सामान्य माणूस असो किंवा लहान-मोठा कोणीही, ते सर्वांना मदत करायचे. अगदी कोरोना काळातही आणि बंगल्यावर येणाऱ्या मीडिया कर्मचाऱ्यांसाठीही ते स्वतः चहा-नाश्त्याची व्यवस्था करायला सांगायचे."
अजित पवार यांची आठवण काढताना शामराव म्हणाले, "मला खूप दुःख होत आहे. ते शब्दांत सांगता येत नाही. दादा गेले आहेत, हे मानायला माझं मन तयार नाही. मला अजूनही वाटतंय की ते आपल्यातच आहेत, कुठेही गेलेले नाहीत."