जाहिरात

Vasai News: नागरिकांच्या जीवाशी खेळ! भाजप नगरसेवकांची वसई पालिकेच्या रुग्णालयावर धाड, धक्कादायक वास्तव उघड

Vasai Virar : वसईच्या डी. एम. पेटीट रुग्णालयात भाजप नगरसेवकांनी टाकलेल्या धाडीत मुदतबाह्य औषधांचा साठा सापडला आहे. आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांच्यावर औषध रॅकेट चालवल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांनी गोडाऊन सील केले आहे.

Vasai News: नागरिकांच्या जीवाशी खेळ! भाजप नगरसेवकांची वसई पालिकेच्या रुग्णालयावर धाड, धक्कादायक वास्तव उघड

वसई-विरार महापालिकेच्या डी. एम. पेटीट रुग्णालयात भाजप नगरसेवकांनी अचानक धाड टाकली. या तपासणीत रुग्णांना दिली जाणारी औषधे मुदतबाह्य (Expired) असल्याचे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून महापालिकेतील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.

धाडसी तपासणी आणि धक्कादायक वास्तव

भाजप गटनेते अशोक शेळके, नगरसेवक अभय कक्कड आणि विशाल जाधव यांना रुग्णालयात बोगस व मुदतबाह्य औषधांचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अचानक रुग्णालयात धाड टाकली. गोदामात तपासणी केली असता, मोठ्या प्रमाणात अशी औषधे सापडली ज्यांची वापरण्याची मुदत संपली होती. डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शनवर विशिष्ट औषध कंपन्यांचे ब्रँड लिहिले जात असल्याचेही या वेळी उघड झाले, ज्यामुळे कमिशनचे रॅकेट सुरू असल्याचा संशय बळावला आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

भाजप गटनेते अशोक शेळके यांनी थेट महापालिकेच्या आरोग्य अधिकारी *डॉ. भक्ती चौधरी* यांच्यावर निशाणा साधला आहे. "डॉ. चौधरी यांचे महापालिकेत मोठे मेडिसिन रॅकेट सुरू असून, त्या गरीब रुग्णांच्या आरोग्याशी खेळत आहेत," असा गंभीर आरोप शेळके यांनी केला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार उघडकीस येताच डॉ. भक्ती चौधरी या संपर्काबाहेर गेल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस कारवाई आणि तपास

या गंभीर प्रकरणाची दखल घेत वसई पोलिसांनी तातडीने रुग्णालयातील औषधांचे गोडाऊन सील केले आहे. पोलिसांनी गोदामाची चावी ताब्यात घेतली असून सर्व औषधांच्या साठ्याचा पंचनामा केला जात आहे. वसई पोलीस या प्रकरणात नेमका कोणाचा हात आहे आणि हे मुदतबाह्य औषध रॅकेट किती मोठे आहे, याचा तपास करत आहेत.

रुग्णांच्या जिवाचा प्रश्न

सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणारा गरीब रुग्ण डॉक्टरांवर विश्वास ठेवून औषधे घेतो. मात्र, अशा प्रकारे मुदतबाह्य औषधे देऊन त्यांच्या जिवाशी खेळणे हा मानवतेला काळिमा फासणारा प्रकार असल्याची भावना नागरिकांमध्ये उमटत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com