गुरुप्रसाद दळवी, प्रतिनिधी
Konkan Tourism Latest News Update : पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेत मालवण बंदर क्षेत्रात 26 मे 2026 पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. याबाबतचे आदेश प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन एस.टी. उगालमुगले यांनी सर्व बंदर निरीक्षक,सहायक बंदर निरीक्षक यांना दिले आहेत.
सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक,सर्व प्रकारच्या व्यावसायिक जलक्रीडा (वॉटर स्पोर्ट्स),नौकाविहार (बोटिंग) आणि स्कूबा डायव्हिंग या बंद राहणार आहेत. प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्या 13 मे 2026 च्या पत्राचा संदर्भ देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.'इनलँड व्हेसल्स ॲक्ट,1197'अंतर्गत नोंदणी असलेल्या सर्व जहाजांना आणि बोटींना जलवाहनांना या मान्सून काळात सुरक्षिततेच्या कारणास्तव आपली वाहतूक आणि व्यावसायिक उपक्रम थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
मालवण बंदर विभागाकडून कार्यवाही सुरु
या आदेशाची कार्यवाही मालवण बंदर विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.मालवणमधील एकूण 31 प्रमुख संस्था,गृहनिर्माण व पर्यटन सोसायट्या आणि वैयक्तिक बोट चालकांना थेट बजावण्यात आले आहे.यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन,शिवशक्ती जलपर्यटन संस्था चिवला,जलपर्यटन संस्था,तारकर्ली,देवबाग आणि दांडी येथील बोटिंग संघटना,स्थानिक स्कूबा डायव्हिंग व्यावसायिक आणि वैयक्तिक बोट मालक यांचा समावेश आहे.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना,18 वर्षीय तरुणीचा जीवनप्रवास संपला, CET परीक्षेनंतर काय घडलं?
या पार्श्वभूमीवर आणि सुरक्षिततेबाबत कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो.अशा परिस्थितीत पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून दरवर्षी प्रशासनातर्फे ही खबरदारीची उपाययोजना केली जाते.मागील वर्षी देखील 20 मे पासूनच पर्यटन हंगाम बंद झाला होता. गतवर्षी 20 मे रोजी झालेल्या तुफानी पावसामुळे जलपर्यटनाला 'ब्रेक'लागला होता.तर यावर्षी 26 मे पासून अधिकृतपणे ही बंदी लागू होत आहे.
मालवणच्या दांडी किनारी पर्यटकांची मोठी गर्दी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून मोठ्या संख्येने पर्यटक मालवणमध्ये दाखल झाले आहेत. येत्या 26 मे पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हंगामाला ब्रेक लागणार असून वॉटर स्पोर्ट्स, किल्ला फेऱ्या बंद होणार आहेत.येणारा पावसाळा आणि हवामानातील बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हंगाम दरवर्षी बंद केला जातो. त्यामुळे आज विकेंडच्या दिवशी मालवणच्या दांडी किनारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world