
गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग
यंदाच्या सीजमधील पहिला हापूस आंब्याची पेटी नवी मुंबई एपीएमसी येथे दाखल झाली आहे. देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर 6 डझन हापूस आंब्यांची पेटी मुंबई येथील वाशी मार्केटला रवाना केली आहे.
यावर्षीच्या मोसमी हापूस आंब्यांच्या विक्रीचा प्रारंभ या पेटीद्वारे झाला असून हापूसच्या पहिल्या पेटीचा मान शिर्सेकर यांना मिळाला आहे. पडवणे गावातील शिर्सेकर यांच्या बागेत जुलै महिन्यात तीन ते चार कलमांना मोहोर आला होता. त्यातील दोन कलमांवरील मोहराचे त्यांनी प्लास्टिक आवरण घालून संरक्षण केले होते.
(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)

योग्य काळजी व फवारणीमुळे त्या कलमांवर सुमारे 6 पेट्यांइतकी फळधारणा झाली. त्यापैकी पहिली पेटी त्यांनी 20 ऑक्टोबरला वाशी मार्केटकडे रवाना केली. वाशी येथील नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनी या दलालमार्फत ही आंबापेटी विक्रीस ठेवली जाणार असून विक्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आंबा पेटी विक्रीस ठेवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बाजार समितीतील दलाल वर्गाकडून सांगण्यात येत आहे.
(नक्की वाचा- Whatsapp वर मिळतील PAN कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससह महत्त्वाची कागदपत्रे; वाचा सविस्तर)
याआधीही सुमारे पाच वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात शिर्सेकर यांनी हापूस पेटी वाशी मार्केटला पाठवण्याचा मान मिळवला होता. मात्र यावर्षी त्यांनी ऑक्टोबर महिन्यातच आंबा पेटी पाठवून विक्रमी प्रारंभ केला आहे. कोकणातून इतक्या लवकर वाशी मार्केटला हापूस आंब्यांची पेटी रवाना करणारे प्रकाश शिर्सेकर हे पहिलेच बागायतदार ठरले असून उद्याच्या विक्रीदरम्यान या आंबापेटीला विक्रमी भाव मिळेल, अशी बाजारपेठेत चर्चा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world