Devgad Hapus केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील आंबाप्रेंमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या हापूस आंब्याची पहिली पेटी ऑक्टोबर महिन्यात दिवाळीत वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाली होती. देवगडच्या या हापूस आंब्याला आतापर्यंतचा सर्वाधिक भाव मिळाला आहे. देवगड हापूसचचे सहा डझन पिकलेल्या आंब्याची पेटी २५ हजार रुपयांना विकली गेली आहे. मंगळवारी बोली लावून या पेटीची विक्री करण्यात आली.
देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांनी सहा डझन आंब्याची पेटी फळ बाजारात आणली. आंब्याच्या पेटीची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करण्यात आली. आंबे पिकल्यानंतर त्याची विक्री करण्यात आली. यापूर्वी दिवाळीत दाखल होणाऱ्या आंब्याच्या पेटीला २० ते २२ हजारांपर्यंतचा भाव मिळाला होता. यंदा पहिल्यांदा देवगडच्या हापूस आंब्याला २५ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.
नक्की वाचा - Alphonso Mango: हापूस आंबा ओळखणं आता होणार सोपं, 'या' गोष्टीमुळे फसवणूक टळणार
यंदा लक्ष्मीपूजनाचा आंब्याची पेटी बाजारात दाखल
यावर्षीच्या मोसमी हापूस आंब्यांच्या विक्रीचा प्रारंभ या पेटीद्वारे झाला असून हापूसच्या पहिल्या पेटीचा मान शिर्सेकर यांना मिळाला आहे. पडवणे गावातील शिर्सेकर यांच्या बागेत जुलै महिन्यात तीन ते चार कलमांना मोहोर आला होता. त्यातील दोन कलमांवरील मोहराचे त्यांनी प्लास्टिक आवरण घालून संरक्षण केले होते. योग्य काळजी व फवारणीमुळे त्या कलमांवर सुमारे 6 पेट्यांइतकी फळधारणा झाली. त्यापैकी पहिली पेटी त्यांनी 20 ऑक्टोबरला वाशी मार्केटकडे रवाना केली. वाशी येथील नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनी या दलालमार्फत ही आंबापेटी विक्रीस ठेवली जाणार असून विक्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आंबा पेटी विक्रीस ठेवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बाजार समितीतील दलाल वर्गाकडून सांगण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world