
निनाद करमरकर, अंबरनाथ
एका तरुणाची पार्टीत झालेल्या वादातून धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली आहे. अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात ही घटना घडली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या 12 तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
बारकू पाडा परिसरात तुषार देडे हा 18 वर्षीय तरुण त्याचा मित्र महेश डाबी आणि अन्य काही जणांसोबत पार्टी करत बसला होता. यावेळी तिथे आलेला आरोपी समीर वाघे याचे त्यांच्याशी वाद झाले. या वादातून समीर वाघे याने त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने महेश डाबी याच्या डोक्यावर आणि तुषार देडे याच्या गुप्तांगावर वार केले होते. यात गंभीर जखमी झालेल्या तुषार याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 12 तासातच आरोपी समीर वाघे याला अंबरनाथ एमआयडीसी परिसरातून अटक केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भवारी यांच्यासह पोलीस हवालदार कैलास पाटील, विकास वळवी, चौधरी, बोरसे, खामकर, पोलीस नाईक देवरे, किनारे, पोलीस शिपाई राजगे, मुठे, काकडे, चत्तर, बोडके, गायकवाड आणि दादा वाघमारे यांच्या पथकाने या आरोपीला शोधून काढलं.
समीर वाघे याच्यावर यापूर्वीचा एक घरफोडीचा गुन्हा दाखल असून त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील हे देखील उपस्थित होते.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन महिन्यात हत्येच्या ३ घटना घडल्या असून त्यामुळे पोलिसांची गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाया वाढवण्यात आल्याची माहिती सुद्धा यावेळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. त्यामुळे आता तरी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी कमी होते का? हे पाहावं लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world