निनाद करमरकर, अंबरनाथ
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच उमेदवार विजयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया शोधून काढत आहेत. मात्र समान नावाच्या उमेदवारांना काहींची डोकेदुखी वाढवली आहे. अंबरनाथ आणि मुरबाडमध्ये या उमेदवारांचा महाविकास आघाडीला फटका बसू शकतो. लोकसभेला देखील शरद पवार गटाला समान नावाच्या उमेदवाराचा फटका बसला होता.
अंबरनाथमध्ये एकाच नावाचे दोन उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी एक आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजेश देवेंद्र वानखेडे, तर दुसरे आहेत अपक्ष उमेदवार राजेश अभिमन्यू वानखेडे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी कुणीतरी ही आयडिया केली आहे का? अशी कुजबुज सध्या अंबरनाथ शहरात सुरू आहे.
ठाकरे गटाचे उमेदवार राजेश देवेंद्र वानखेडे यांना विचारलं असता हा कोणीतरी जाणीवपूर्वक उभा केलेला उमेदवार असू शकतो, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. मात्र असं असलं तरीही मतदार नाव पाहून नव्हे, तर चिन्ह पाहून मतदान करतात. त्यामुळे मला कोणताही फटका बसणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर अपक्ष उमेदवार राजेश अभिमन्यू वानखेडे यांना याबाबत विचारलं असता, मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून निवडणूक लढवत असून लवकरच भेटून प्रतिक्रिया देऊ असं ते म्हणाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर या कुणाच्या तरी जाणीवपूर्वक केलेल्या करामती तर नाहीत ना? अशी चर्चा अंबरनाथ शहरात रंगली आहे.
मुरबाडमध्ये शरद पवार गटाला बसणार धक्का?
मुरबाड मतदारसंघात सुभाष पवार नावाचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी सुभाष गोटीराम पवार हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार असून दुसरे सुभाष शांताराम पवार हे अपक्ष उमेदवार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अपक्ष सुभाष पवार यांनी तुतारी चिन्हाची मागणी केली आहे.
एकाच नावाचे दोन उमेदवार निवडणुकीत उभे राहिल्यामुळे मतांचं विभाजन होईल, या हेतूने कुणीतरी मुद्दाम अपक्ष उमेदवाराला उभं केल्याची चर्चा मुरबाड मतदारसंघात सुरू आहे. दरम्यान, अपक्ष उमेदवार सुभाष शांताराम पवार यांच्यासह सुरेश जमदाडे आणि रवींद्र सोनवणे या दोन अपक्ष उमेदवारांनीही तुतारी चिन्हाचीच मागणी केलीये. लोकसभा निवडणुकीत तुतारी, पिपाणी अशा चिन्हांमुळे काही जागांवर अपक्ष उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मतदान झालं होतं. ज्याचा फटका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांना बसला होता. त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती आता विधानसभेत तर होणार नाही ना? अशी भीती यानंतर व्यक्त होतेय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world