निनाद करमरकर, अंबरनाथ
अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या कार्यकर्त्यांसमोर दिलगिरी व्यक्त केली आहे. कळत नकळत ज्या चुका झाल्या, त्यामुळे तुमची मनं दुखावली असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं आमदार किणीकर म्हणाले. या दिलगिरीचा व्हिडीओ सध्या शहरात व्हायरल झाला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंबरनाथमधील शिवसेनेत असलेली गटबाजी मिटवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यात समेट घडवून आणली होती. यानंतर आमदार बालाजी किणीकर हे तब्बल 5 वर्षांनी शहर प्रमुख वाळेकर गटाच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी शहरशाखेत गेले होते.
यावेळी बोलताना "माझ्याकडून मागील काळात कळत नकळत ज्या चुका झाल्या असतील, केसेसच्या माध्यमातून तुम्हाला त्रास झाला असेल, किंवा कुणाची मनं दुखावली असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो", असं आमदार किणीकर म्हणाले. "मी कोणत्याही वरिष्ठांचा अपमान होईल, असं आजवर कधीही काहीही बोललेलो नाही.
(नक्की वाचा- Maharashtra Election : वडील रुग्णालयात, मुलगा दु:खात; कार्यकर्त्यांनी एकत्र येत परस्पर दाखल केला उमेदवारी अर्ज)
मात्र तरीही तुमच्या ऐकण्यात असं काही आलं असेल, तर त्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतो", असं किणीकर म्हणाले. तसेच "आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्रितपणे काम करू आणि नगरपालिकेच्या निवडणुका देखील वाळेकर यांच्याच नेतृत्वात लढवू!", असंही आमदार बालाजी किणीकर म्हणाले.
(ट्रेंडिंग बातमी - राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?)
या दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात सोशल मीडियावर देखील टीकाटिप्पणी केली जाते त्यावरही आपली भूमिका मांडत यापुढे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर टीकाटिप्पणी न करण्याचं आवाहन किणीकर यांनी केलं. तसंच माझ्या कार्यकर्त्यांनी असं काही केल्यास त्याची मी स्वतः तक्रार करेन, असंही किणीकर यांनी स्पष्ट केलं. बालाजी किणीकर यांच्या दिलगिरीचा हा व्हिडिओ शहरात व्हायरल झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world