
Bachat Gat Mahila News: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत विविध योजना आणि उपक्रम राबवत असतात. महानगरपालिका नियोजन विभागाच्या माध्यमातून बचत गट स्थापन करून महिलांचे आर्थिक सबलीकरणही करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता मुंबई मनपा आणि घरोघरी खाद्यपदार्थ पोहोच करणारी 'झोमॅटो' कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्रोजेक्ट आर्या' उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत आता खाद्य पदार्थ वितरणाच्या क्षेत्रातही महिला बचत गट आपला ठसा उमटवणार आहेत. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी महानगरपालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. कौतुकाची बाब म्हणजे 'झोमॅटो'सोबत महिला बचत गटांसाठी अशाप्रकारे उपक्रम राबवणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था ठरलीय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उपक्रमाचा शुभारंभ कधी आणि कुठे होणार?
'प्रोजेक्ट आर्या'चा शुभारंभ 5 मार्च 2025 पासून करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते तसेच संचालक डॉ. प्राची जांभेकर, झोमॅटोचे मुंबई विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश आहुजा यांच्या उपस्थितीत मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात संध्याकाळी 5.30 वाजता या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. या उपक्रमासाठी एकूण 30 ते 40 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 15 महिलांची निवड करण्यात आली आहे. आता या महिला खाद्यपदार्थ पोहोचवण्याचे काम करणार आहेत.
(नक्की वाचा: Investment Tips: महिलांनी गुंतवणुकीचा ट्रेंड बदलला; शेअर बाजाराऐवजी 'या' क्षेत्रात करत आहेत गुंतवणूक)
बचत गट म्हटले की लोणची, पापड तयार करणे, कापडी पिशव्या तयार करणे, सजावटीची साहित्य तयार करणे अशी कामे आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र ही पारंपरिक चौकट ओलांडून महिलांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतलाय. झोमॅटो कंपनीच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेने बचत गटाच्या महिलांसाठी 'प्रोजेक्ट आर्या' सुरू केला आहे.
महिलांना दिले बाइक चालवण्याचे प्रशिक्षण
खाद्यपदार्थ वितरणामध्ये आतापर्यंत पुरुषांचीच संख्या अधिक आढळते. हीच बाब अधोरेखित करून बृहन्मुंबई महानगरपालिकेने यासाठी बचत गटाच्या 30 ते 40 महिलांना बाइक चालवण्याचे प्रशिक्षण दिलंय. तसेच स्वरक्षणाचे धडेही दिले आहेत. यासोबतच मोबाइल अॅपद्वारेही या महिला प्रसंगी गरज भासल्यास आपल्कालीन संदेश (एसओएस) पाठवून स्वत:चे रक्षण करू शकणार आहेत.
(नक्की वाचा : अदाणी पोर्ट्सचा प्रवास उलगडणार, अदाणी ग्रुपकडून 'जर्नी ऑफ ड्रीम्स' फिल्म लॉन्च)
भारतातील पहिलीच महानगरपालिका
झोमॅटोसोबत अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही भारतातील पहिलीच महानगरपालिका आहे. या उपक्रमांतर्गत दुर्बल घटकांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध संकल्पना राबवण्यात येणार आहेत. सुरुवातीला महानगरपालिकेच्या टी विभागात म्हणजे मुलुंड परिसरात हा उपक्रम सुरू होत आहे. यानंतर इतर सर्व विभागांमधील (वॉर्ड) बचत गटातील महिलांनाही यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या स्वयं सहायता समूहाच्या माध्यमातून हा उपक्रम पार पाडण्यात येणार आहे.
सहभागी महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती
प्रोजेक्ट आर्यामध्ये सहभागी महिलांना नोंदणी प्रक्रिया, प्रशिक्षण, सुरक्षा उपायबाबतच्या योजना आणि विमा सुविधा झोमॅटोकडून प्रदान करण्यात येणार आहेत. या उपक्रमात सहभागी महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती, अपघात विमा, मातृत्व विमा, कुटुंबासाठी विमा, मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांची सुटी, नि:शुल्क सुरक्षा साहित्य आदी बाबींचा समावेश आहे. सध्या मुलुंड (टी वॉर्ड) येथे इच्छुक महिलांकरीता झोमॅटो अॅपवर नोंदणीसाठी प्रशिक्षण सत्रे आणि इलेक्ट्रिक बाइक चालवण्याचे विशेष प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जात आहेत, अशी माहिती संचालक डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world