Badlapur furniture encroachment : बदलापूर हे शहर वाढत आहे. त्यामुळे इथं अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढत चालले आहे. शहराला अनधिकृत बांधकामाचा विळखा बसत चालला आहे. त्यामुळे संपूर्ण शहर विद्रुप होत चाललं आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने आता धडक कारवाईची भूमीका घेतली आहे.
बदलापूर नगरपालिका प्रशासनानं अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. २ फेब्रुवारी रोजी पालिकेमार्फत अंबरनाथ-बदलापूर हायवे तसेच पनवेल हायवे लगतची अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली. पुढील आठ ते दहा दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे. त्यावेळी शहरातील 400 हून अधिक अनधिकृत बांधकामं हटवण्यात येतील अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
बदलापूरकरांची मोठी झुंबड...
दरम्यान यामध्ये अंबरनाथ-बदलापूर हायवेवरुन सलग असलेली फर्निचर दुकानंही हटवण्यात आली. यावेळी दुकानदारांनी कमी किमतीत फर्निचर विक्री सुरू केली होती. बदलापुरात ही बाब पसरताच फर्निचर खरेदीसाठी मोठी झुंबड जमा झाली. २५ ते ३० हजारांचं फर्निचर अवघ्या १० ते ११ हजार रुपयात विकलं जात होतं. या फर्निचर झोनमध्ये तब्बल ५० लाखांचा माल असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्याकडे एक दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्यामुळे दुकानदारांनी फर्निचरची सेलमध्ये विक्री केली. त्यामुळे बदलापूरकरांनी खरेदीसाठी तुफान गर्दी केली होती.
कुणाचं नुकसान तर कुणाचा फायदा...
अतिक्रमण कारवाईमध्ये स्वस्त किमतीत फर्निचर विकलं जात असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. स्थानिकांचा याचा मोठा फायदा झाला. मात्र दुकानदारांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. येथे ३५ हजारांचा वॉर्डरॉब १८ हजारात विकला जात होता. दुकानदारांनी आलेल्या किमतीत फर्निचर विकल्याने त्यांना मोठा तोटा झाला सहन करावा लागला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world