जाहिरात

Beed News : MPSC चा टॉपर ते मोठा झोलर; तब्बल 45 लाखांची लाच घेताना ACB ने पकडलं रंगेहात

महाराष्ट्रात MPSC चा टॉपर असलेला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे.

Beed News : MPSC चा टॉपर ते मोठा झोलर; तब्बल 45 लाखांची लाच घेताना ACB ने पकडलं रंगेहात

आकाश सावंत, प्रतिनिधी

Beed News : महाराष्ट्रात MPSC चा टॉपर असलेला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने त्याला रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजलीय. कोण आहे का 'टॉप'चा झोलर? 

एका झटक्यात तब्बल 45 लाख रुपयांची लाच

बीडच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आकाशी रंगाचा शर्ट घालून मोठ्या टेचात बसलेला हाच तो  अधिकारी. नाव श्रीनिवास लखमवाड... 2016 सालच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेतला तो टॉपर आहे. पण फक्त अभ्यासातच तो हुशार नाही, लाचखोरीतही तो टॉपचा झोलर आहे. एका झटक्यात तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेण्याची कला त्याने सरकारी सेवेला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या दहा वर्षांतच आत्मसात केली. 

सामाजिक वनीकरण विभागात हा  श्रीनिवास लखमवाड विभागीय वन अधिकारी म्हणून बीड जिल्ह्यात नियुक्त आहे. 2025-26 मधील वृक्ष लागवडीची बिलं मंजूर करून देण्यासाठी त्याने तब्बल 12 टक्के कमिशनची मागणी केली. लाचेपोटी तब्बल 45 लाख रुपयांची मागणी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या बैठकीला हजेरी लावून तो घरी परत आला. आणि घरीच लाचेची रक्कम स्विकारताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली. 

या कारवाईनंतर एसीबीचं पथक लखमवाडच्या नांदेड इथल्या निवासस्थानीही पोहोचलंय. 

MPSC 'टॉपर' ते 'झोलर'

श्रीनिवास लिंगन्ना लखमवाड हा मूळचा नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी गावचा रहिवासी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2016 सालच्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत तो एसटी प्रवर्गातून राज्यात पहिला आला. दहावीपर्यंत नांदेडमध्ये शिकल्यानंतर पुढे त्याने बी.टेकपर्यंतचं शिक्षण घेतलं. स्वतःवर विश्वास, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कष्ट करण्याची तयारी असली की कोणत्याही अडचणीवर मात करता येते, अशी प्रतिक्रिया त्यांनी वनसेवेत टॉप केल्यानंतर व्यक्त केली होती. 

नक्की वाचा - काळं तेल, तंबाखूच्या पुड्या; संभाजीनगरमधील इमारतीसाठी प्रसिद्ध उपहारगृहाला मुंढे यांचा दणका; परवाना निलंबित

प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे आणि नाशिक इथे त्यांची बेनामी मालमत्ता असल्याचा संशय आहे. त्या अनुषंगाने ACB कडून अधिक तपास सुरू असून त्याच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जातेय. अगोदरच राजकीय गुन्हेगारीमुळे बीड जिल्ह्यातले राजकारणी चर्चेत आहेत, अशातच भ्रष्टाचाराच्या या प्रकरणामुळे भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांची चर्चाही सुरू झालीय.

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com