Pune News: 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर अखेर आजपासून भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाने मुख्य मंदिरासमोरील सभामंडपाचे काम वेगाने पूर्ण केल्याने आजपासून दर्शनाची सुविधा पूर्ववत सुरू झाली आहे. मात्र, परिसरात अद्याप काही कामे अंतिम टप्प्यात असल्याने आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाने दर्शनासाठी ऑनलाईन पास अनिवार्य केला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भीमाशंकर मंदिरात सध्या प्रतिदिन केवळ 1000 भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
दर्शनाचा पास कसा मिळवायचा?
भाविकांना दर्शनासाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या https://shreebhimashankar.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच भाविकांना पास उपलब्ध होईल. भाविकांना 30 जूनपर्यंत दररोज सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनी दर्शनासाठी येताना आपले वैध ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. नोंदणीकृत भाविकांची यादी दररोज संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
(नक्की वाचा- Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)
5 महिन्यांत पूर्ण झाले काम
नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. प्रयागराज महाकुंभ 2025 च्या अनुभवावरून, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांपैकी मोठा वर्ग भीमाशंकर दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. याच संभाव्य गर्दीचा विचार करून भीमाशंकर येथे नवीन सभामंडप आणि पायरी मार्गाचे काम हाती घेण्यात आले होते.
या कामासाठी देवस्थान ट्रस्टने 9 जानेवारीपासून मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, ज्याला नंतर 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सामान्य परिस्थितीत या मुख्य सभामंडपाच्या कामासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी अपेक्षित होता. तथापि, भिमाशंकर संस्थान, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविक यांच्या सहकार्यामुळे रात्रंदिवस अखंड काम सुरू ठेवून हे काम केवळ पाच महिन्यांत पूर्ण करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Mumbai-Pune: मुंबई-पुणे सुसाट! अवघ्या 48 मिनिटात पूर्ण होणार प्रवास; रेल्वे मंत्रालयाचा मास्टरप्लॅन)
किरकोळ कामे अंतिम टप्प्यात
मुख्य सभामंडपाचे काम पूर्ण झाले असून दर्शनबारी (क्यू लाईन) उभारणी, परिसर स्वच्छता आणि गर्दी व्यवस्थापनासाठीची पायाभूत कामे पूर्ण झाली आहेत. सध्या उर्वरित किरकोळ कामे जलदगतीने पूर्ण करून बांधकाम साहित्य, दगड आणि यंत्रसामग्री हटवली जात आहे. परिसर भाविकांसाठी मोकळा करण्याच्या उद्देशाने आजपासून मर्यादित स्वरूपात मंदिर खुले करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि मंदिर प्रशासनाने भाविकांना व स्थानिक नागरिकांना या नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world