मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीला मोठा तांत्रिक आणि राजकीय फटका बसला आहे. बंडखोरी रोखण्यासाठी पाळलेली कमालीची गुप्तता भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या अंगाशी आली असून, मुंबईतील 4 महत्त्वाच्या प्रभागांमध्ये महायुतीचा एकही अधिकृत उमेदवार रिंगणात नसल्याचे समोर आले आहे. यामुळे मतदानापूर्वीच महायुतीने या 4 जागा गमावल्याचे मानले जात आहे.
बंडखोरांना रोखण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्याच्या नादात महायुतीचे 4 प्रभागांत उमेदवारच उभे राहू शकले नाहीत. आता 227 जागांपैकी महायुती केवळ 223 जागांवर निवडणूक लढवणार आहे. लोकमतने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
कोणत्या प्रभागांत उमेदवार नाहीत?
- प्रभाग 211 (दक्षिण मुंबई)
- प्रभाग 212 (दक्षिण मुंबई)
- प्रभाग 145 (ट्रॉम्बे-चिता कॅम्प)
- प्रभाग 167 (कुर्ला पश्चिम)
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
डमी उमेदवार न दिल्याने बसला फटका
निवडणुकीत सहसा मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून 'डमी' उमेदवार दिला जातो. मात्र, यावेळी जागावाटपाचा पेच आणि नावांची गुप्तता पाळण्यासाठी उमेदवारांना रात्री उशीरा पक्ष कार्यालयात बोलावून एबी फॉर्म (AB Form) देण्यात आले. या घाईघाईत आणि गोपनीयतेत डमी अर्ज भरले गेले नाहीत, परिणामी तांत्रिक कारणांमुळे किंवा वेळेअभावी या 4 प्रभागांत महायुतीचे अधिकृत उमेदवार रिंगणाबाहेर गेले आहेत.
आता कशी असेल लढत?
- प्रभाग 145 - राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध काँग्रेस विरुद्ध शिवसेना (UBT) (येथे महायुतीतील अजित पवार गट स्वतंत्र लढत आहे).
- प्रभाग 167 - काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि समाजवादी पक्ष यांच्यात लढत.
- प्रभाग 211 - राष्ट्रवादी (अजित पवार), काँग्रेस आणि समाजवादी पक्ष.
- प्रभाग 212 - काँग्रेस, मनसे आणि अखिल भारतीय सेना यांच्यात चुरस.
निकालावर काय परिणाम होईल?
राज्यात अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे चित्र असताना, मुंबईत मात्र 4 जागांवर उमेदवार नसणे ही नामुष्की असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे महापालिकेच्या मॅजिक फिगरपर्यंत (114) पोहोचण्यासाठी महायुतीला आता उर्वरित 223 जागांवर अधिक जोर लावावा लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world