Maharashtra Election 2026 : राज्यातील तब्बल 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी म्हणजेच 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. या मतदानासाठी राज्य निवडणूक आयोगाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून प्रशासनाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. एकूण 2869 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत हजारो उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.
मतदानाची जय्यत तयारी आणि आकडेवारी
या निवडणुकांसाठी राज्यभरात एकूण 39092 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक रिंगणात एकूण 15908 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मतदारांच्या संख्येचा विचार केला तर एकूण 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 कोटी 81 लाख 94 हजार 292 पुरुष, 1 कोटी 66 लाख 80 हजार 449 महिला आणि 4596 इतर मतदारांचा समावेश आहे. एकूण केंद्रांपैकी 3196 केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून तिथे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
( नक्की वाचा : KDMC Election 2026: मतदार यादीत नाव कसं शोधायचं? बातमीतील QR Code लगेच स्कॅन करा आणि मिळवा सर्व माहिती )
कोणत्या महानगरपालिकांचे होणार मतदान?
राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2025 रोजी या निवडणुकांचे बिगुल वाजवले होते. त्यानुसार 15 जानेवारी रोजी खालील शहरातील महानगपालिकांची निवडणूक होणार आहे.
मुंबई
नवी मुंबई
ठाणे
पुणे
पिंपरी-चिंचवड
नागपूर
नाशिक
कोल्हापूर
छत्रपती संभाजीनगर
कल्याण-डोंबिवली
वसई-विरार
उल्हासनगर
सोलापूर
अकोला
अमरावती
चंद्रपूर
लातूर
परभणी
भिवंडी-निजामपूर
मालेगाव
पनवेल
मीरा-भाईंदर
नांदेड-वाघाळा
सांगली-मीरज-कुपवाड
जळगाव
धुळे
अहिल्यानगर
इचलकरंजी
जालना
मतदानाची वेळ आणि मतमोजणी
मतदारांना 15 जानेवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत आपले मत नोंदवता येईल. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वांचे लक्ष निकालाकडे असणार आहे. या निवडणुकांची मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून संबंधित ठिकाणी सुरू होईल. दुपारी बारा वाजेपर्यंत अनेक ठिकाणचे कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : BMC Election 2026 : मतदानाच्या दिवशी बँका सुरु की बंद? खासगी कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार का? वाचा सर्व माहिती )
EVM चा वापर कसा होणार?
निवडणूक आयोगाने मतदानासाठी पुरेशा प्रमाणात ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यभरात 43958 कंट्रोल युनिट आणि 87916 बॅलेट युनिट तैनात करण्यात आले आहेत. एकट्या मुंबई महानगरपालिकेसाठी 11349 कंट्रोल युनिट आणि 22698 बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेत कोणताही तांत्रिक अडथळा येऊ नये यासाठी तज्ज्ञांची पथकेही तैनात असतील.
मुंबई आणि इतर शहरांमधील मतदान पद्धतीतला फरक
यावेळच्या निवडणुकीत मुंबई आणि इतर शहरांच्या मतदान पद्धतीत थोडा फरक आहे. मुंबईत एका प्रभागातून एकच सदस्य निवडायचा असल्याने मुंबईकरांना केवळ एकच मत द्यावे लागेल. मात्र, इतर 28 शहरांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत आहे. तिथे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा आहेत, तर काही ठिकाणी तीन किंवा पाच जागा असू शकतात. त्यामुळे मुंबईबाहेरील मतदारांना त्यांच्या प्रभागातील सदस्यांच्या संख्येनुसार 3 ते 5 मते द्यावी लागणार आहेत.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी गृह विभागाने मोठा फौजफाटा तैनात केला आहे. सुरक्षेसाठी 3 अपर पोलिस अधीक्षक, 63 पोलिस उप अधीक्षक, 56 पोलिस निरीक्षक, 858 सहायक पोलिस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक आणि 11938 पोलिस अंमलदार कार्यरत असतील. त्यांना मदत करण्यासाठी 42703 होमगार्ड देखील तैनात आहेत. याशिवाय संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) 57 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
आयुक्तांचे मतदारांना आवाहन
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे. शहराच्या जडणघडणीत योगदान देण्यासाठी आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदान करावे, असे त्यांनी म्हटले आहे. आपले एक मत शहराचे भवितव्य ठरवू शकते, त्यामुळे हा अनमोल हक्क प्रत्येकाने बजावावा, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world