BMC Election : न्यूयॉर्क शहराच्या महापौर निवडणुकीत 34 वर्षीय झोहरान ममदानी यांच्या ऐतिहासिक विजयाचे पडसाद आता थेट मुंबईत उमटताना दिसत आहेत. न्यूयॉर्कचे प्रशासकीय प्रमुख बनणारे ममदानी हे गेल्या 100 वर्षांतील पहिले दक्षिण आशियाई, मुस्लिम आणि सर्वात तरुण महापौर ठरले आहेत. मात्र, मुंबई महानगरपालिकेची (BMC) निवडणूक तोंडावर असताना, मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी या पार्श्वभूमीवर अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
सोशल मीडियावर 'खान'ला विरोध, 'व्होट जिहाद'चा आरोप
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत थेट इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, "आम्ही कोणाही 'खान'ला मुंबईचा महापौर होऊ देणार नाही."
साटम यांनी ममदानी यांच्या विजयाचे उदाहरण देत याला 'व्होट जिहाद' म्हटले आहे. त्यांच्या मते, न्यूयॉर्क शहरात ज्या प्रकारचं राजकारण दिसलं, त्याच प्रकारचं राजकारण मुंबईत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
( नक्की वाचा : BMC Election: 'मुंबईचा प्रत्येक रस्ता मोहम्मद अली रोड होईल', पालिका निवडणुकीसाठी भाजपाचा रोडमॅप निश्चित )
काय म्हणाले साटम?
अंधेरी पश्चिमचे आमदार आणि मुंबई भाजपचे प्रमुख अमीत साटम यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, "आम्ही कोणत्याही खानला मुंबईचा महापौर होऊ देणार नाही." हे राजकारण 'व्होट जिहाद' (Vote Jihad) आहे. न्यूयॉर्क शहरात जे राजकारण दिसले, तेच राजकारण मुंबईत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आपल्या वक्तव्याचा नेमका अर्थ स्पष्ट करताना भाजप नेत्याने सांगितले की, "काही लोक राजकीय सत्ता टिकवून ठेवण्यासाठी तुष्टीकरणाचा (appeasement) मार्ग अवलंबत आहेत. यापूर्वी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा शक्तींपासून मुंबईचे संरक्षण करणे आवश्यक आहे." धार्मिक सलोख्यावर विश्वास असल्याचे सांगत साटम पुढे म्हणाले, "जर कोणी राष्ट्रविरोधी भूमिका घेऊन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला आमचा विरोध असेल."
कोण आहेत ममदानी?
झोहरान ममदानी यांनी या निवडणुकीत माजी न्यूयॉर्क गव्हर्नर अँड्र्यू कुओमो (Andrew Cuomo) आणि रिपब्लिकन उमेदवार कर्टिस स्लिवा (Curtis Sliwa) यांचा पराभव केला. भारतीय चित्रपट निर्मात्या मीरा नायर आणि भारतीय वंशाचे महमूद ममदानी यांचे ते सुपुत्र आहेत. मोफत बाल संगोपन, भाडे गोठवणे (rent-freeze), मोफत बस सेवा अशा श्रमिक वर्गाच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र, अमेरिकेतील उजव्या विचारसरणीच्या (American Right) गटांनी आणि जगभरातील समान भावना असलेल्या गटांनी 'स्थलांतरित विरुद्ध स्थानिक' (immigrants vs indigenous people) या वादग्रस्त मुद्द्यावरून आगामी काळात वातावरण तापण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : Zohran Mamdani: ट्रम्प यांच्या धमकीनंतरही न्यूयॉर्कचे 'बॉस' म्हणून निवडून आलेले जोहरान ममदानी कोण आहेत? )
मुंबईच्या राजकारणावरील परिणाम आणि भाजपची रणनीती
भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या BMC च्या निवडणुकीतही 'स्थानिक विरुद्ध बाहेरचा' (Local vs Outsider) हा मुद्दा नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि शिवसेना या मुद्द्यावर राजकारण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आता अमीत साटम यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, आगामी BMC निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (BJP) देखील हीच रणनीती स्वीकारणार आहे.
साटम यांनी ममदानी यांच्या जगभरातील टीकाकारांच्या भूमिकेचा पुनरुच्चार करत म्हटले की, "आम्ही नेहमीच मुंबईच्या विकासासाठी आणि एकतेसाठी उभे राहू. शहरभर वंदे मातरम् कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. प्रत्येक नागरिकाला हे अभिमानाने म्हणण्याचा अधिकार आहे. शहराची सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख बदलण्याचा कोणताही प्रयत्न आम्हाला मान्य नसेल."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world