Mumbai Mayor News: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी निघण्याची दाट शक्यता आहे. यावरून मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रवर्गातील फक्त दोन नगरसेवक असून दोन्ही नगरसेवक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडे आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षांकडून या नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाने केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी होणार आहे. हे पद अनुसूचित जमातीसाठी (ST) राखीव होण्याची दाट शक्यता असल्याने, या प्रवर्गातील नगरसेवकांचे महत्त्व अचानक वाढले आहे.
कोण आहेत ते दोन नगरसेवक?
शिवसेना (UBT) गटाकडे एसटी प्रवर्गातील दोन महत्त्वाचे चेहरे आहेत.
- प्रियदर्शिनी ठाकरे - यांनी प्रभाग 121 मधून विजय मिळवला आहे.
- जितेंद्र वळवी - यांनी प्रभाग 53 मधून विजय मिळवला आहे.
(नक्की वाचा- मुंबईत उभारले जाणार 30 मजली 'बिहार भवन'; जागा आणि बजेटही ठरले)
या दोन्ही नगरसेवकांकडे वैध जात प्रमाणपत्र असल्याने, जर महापौरपद एसटीसाठी राखीव झाले, तर हे दोघेही महापौरपदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात.
सत्ताधाऱ्यांचा दबाव आणि ठाकरे गटाची रणनीती
ठाकरे गटाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन नगरसेवकांवर सत्ताधारी पक्षांकडून विविध माध्यमातून दबाव आणला जात आहे. आपल्या नगरसेवकांची पळवापळवी होऊ नये म्हणून ठाकरे गटाने प्रियदर्शिनी ठाकरे आणि जितेंद्र वळवी यांची विशेष काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही नगरसेवकांचा बाहेरील लोकांशी संपर्क कमी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.
(नक्की वाचा- BMC Mayor: मुंबई महापालिकेत महापौर भाजपचाच होणार; कायद्यात काय आहे तरतूद?)
आरक्षणाची नवीन 'चक्राकार' पद्धत काय आहे?
महापौरपदाचे आरक्षण ठरवताना यंदा नवीन चक्राकार पद्धत वापरली जाण्याची शक्यता आहे. जर जुन्या पद्धतीने आरक्षण निघाले असते, तर एसटी प्रवर्गासाठी पद राखीव होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. यंदा नगरसेवक आरक्षणाप्रमाणेच महापौर आरक्षणही शून्यापासून काढले जाणार आहे. ही एका नवीन चक्राकार पद्धतीची सुरुवात मानली जात आहे, ज्यामध्ये आरक्षण कोणालाही लागू शकते.