जाहिरात

BMC News: पूर्व व पश्चिम द्रूतगती महामार्गांवर राबवणार विशेष स्वच्छता मोहीम

स्वच्छता कालावधीत वाहतूक विभागाच्या मदतीने गरजेनुसार वाहतूक वळवणे किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येतील.

BMC News: पूर्व व पश्चिम द्रूतगती महामार्गांवर राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
मुंबई:

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लहानसहान रस्ते, गल्लीबोळ येथे सखोल स्वच्छता, त्यानंतर रस्ते दुभाजक, बॅरिकेड्स, विविध चौकांची स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्यात आलं. शासकीय, महानगरपालिका व खासगी रूग्णालय परिसरात स्वच्छता असे विविध टप्पे पार केले. त्यानंतर आता पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची विशेष स्वच्छता मोहीम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतली आहे. सोमवार 17 मार्च 2025 ते शनिवार 22 मार्च 2025 या सहा दिवसांच्या कालावधीत दररोज रात्री 10 ते सकाळी 6 वाजेदरम्यान ही मोहीम पार पडणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई महानगराला जोडणारा महत्वाचा दुवा असलेल्या द्रुतगती महामार्गांवर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग स्वच्छ, सुंदर रहावा तसेच राडारोडा मुक्त असावा, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे, असं ते म्हणाले. महामार्गावर सौंदर्यानुभवाच्या दृष्टीकोनातून नियमित सुशोभीकरण आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिल्या आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Shiv sena News: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाची पंजाबमध्ये गोळ्या घालून हत्या, प्रकरण काय?

या मोहिमेविषयी माहिती देताना उपआयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले की, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवर तसेच त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांवर सोमवार 17 मार्च 2025 पासून विशेष स्वच्छता मोहिमेला सुरूवात होणार आहे. शनिवार 22 मार्च 2025 पर्यंत ही विशेष स्वच्छता मोहीम दररोज रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. जेणेकरून वाहतुकीला देखील अडसर होणार नाही. स्वच्छतेची कामे देखील जलद व चांगल्या रीतीने करता येतील. वाहतूक पोलिस विभागाच्या समन्वयाने ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Beed News: 'खोक्या मामाचं घर जाळलं, लेकरांना...' भाची रडली, अंजली दमानियाही संतापल्या

स्वच्छता कालावधीत वाहतूक विभागाच्या मदतीने गरजेनुसार वाहतूक वळवणे किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येतील. जेणेकरून वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. मोहिमेसाठी संयंत्रे, उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे त्यांनी नमूद केले. या मोहिमेसाठी नियोजित कालावधीत कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी विभागीय कार्यालयांवर सोपवण्यात आली आहे. महामार्गाच्या ठिकाणी भूयारी मार्ग, सेवा रस्ते, उतार (रॅम्प) आणि बाहेर पडण्याचे मार्ग आदी परिसरात राडारोडा असणाऱ्या जागांची पूर्वपाहणी करून हे परिसर स्वच्छ करण्यात येणार आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Investment : वयाच्या 35 व्या वर्षी PPF खातं उघडा, निवृत्तीनंतर मिळेल 61,000 टॅक्स फ्री मासिक पेन्शन

तसेच धूळ निर्मूलनासाठी यांत्रिक झाडू संयंत्रे वापरण्यात येणार आहेत. मोहिमेदरम्यान पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची स्वच्छता जेटींग, प्रेशर वॉशर यासारख्या संयंत्राचा वापर करून करण्यात येईल. तसेच रस्त्यावरील वाहतुकीसाठीची सांकेतिक चिन्हे, चौकातील फलक आणि दिशादर्शक फलक यांचीही स्वच्छता, रंगरंगोटी आणि देखभाल दुरूस्ती केली जाईल.द्रुतगती महामार्गालगतच्या कचरा पेट्यांमधील कचरा आणि संकलित केलेला राडारोडा वाहून नेणे, रोपे आणि झाडांभोवतीच्या कुंपणाचा कचरा काढणे, झाडांच्या बुंध्याला चुना आणि गेरूचा वापर करून शास्त्रोक्त पद्धतीने रंगरंगोटी करणे या बाबी या मोहिमेत केल्या जाणार आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Holi 2025: अनोखी राजकीय धुळवड! बड्या नेत्याने रस्ते रंगवत सरकारला घेरलं; कारण काय?

त्यासोबत, पदपथांचे पेव्हर ब्लॉक, दुभाजक विभागीय परिरक्षण खात्यामार्फत दुरूस्त करणे, दुभाजकांची रंगरंगोटी करणे, मोहिमेच्या काळात रस्त्यांना आणि पदपथ स्वच्छतेला अडथळा ठरणाऱ्या वाहनांना हटवणे, अनधिकृत फलक, जाहिरात फलक  निष्कासित करणे, या बाबींचा देखील मोहिमेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या मोहिमेत विभागीय कार्यालयांनी सक्रियपणे सहभाग नोंदवण्याच्या सूचना उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिल्या आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून मुंबईतील नागरिक तसेच पर्यटक यांना द्रुतगती महामार्गाचा वापर करताना एक दर्जेदार आणि सुखद प्रवासाचा अनुभव यावा, हेच ध्येय ठेवून मोहिमेचे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.