जाहिरात

'स्वीकृत'साठी उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना ठेंगा ? एकही नगरसेवकपद मनसेला न देण्यासाठी हालचाली

BMC Nominated Corporators 2026: ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत तर मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत.

'स्वीकृत'साठी उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना ठेंगा ? एकही नगरसेवकपद मनसेला न देण्यासाठी हालचाली
मुंबई:

नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंनी युती करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई महापालिकावर वर्चस्वासाठी ठाकरे बंधू आणि महायुतीमध्ये अटीतटीची लढाई झाली होती. मतांसाठीच्या या युद्धात महायुतीने बाजी मारली असून भाजपला आपला महापौर बसवण्यात यश आलं आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येवर प्रत्येक पक्षाला आपला स्वीकृत नगरसेवक सभागृहात पाठवण्याची संधी असते. तशी संधी ठाकरे बंधूंच्या युतीलाही मिळाली आहे. 

नक्की वाचा: भिवंडीत महापौर पदावरून काँग्रेसमध्ये फूट! भाजप बंडखोराला पाठिंबा दिल्याने जिल्हाध्यक्ष आक्रमक

मनसे रिकाम्या हाती राहणार ?

ठाकरे बंधूंना आपले 3 स्वीकृत नगरसेवक सभागृहात पाठवता येणार आहेत. मात्र हे तीनही स्वीकृत नगरसेवक हे शिवसेना(उबाठा)चेच असावेत यासाठी ठाकरेंची शिवसेना प्रयत्नशील आहेत. मनसेने तीनपैकी एक स्वीकृत नगरसेवकपद आपल्याला मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केला होता. ठाकरेंच्या शिवसेनेने तीनही स्वीकृत नगरसेवक हे आपल्याच पक्षाचे पाठवायचे ठरवल्यास मनसेला रिकाम्या हाती राहावे लागेल. 

कोण होणार स्वीकृत नगरसेवक?

ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे काही संभाव्य नावे सध्या चर्चेमध्ये आहेत. यामध्ये साईनाथ दुर्गे, अखिल चित्रे, माधुरी मांजरेकर, प्रमोद शिंदे, हेमंत दुधवडकर, कैलास पाठक, विजय कामठेकर यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून स्वीकृत नगरसेवक पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेतील इच्छुकांसोबत चर्चा सुरू आहे. 25 फेब्रुवारीला तारखेला स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली जाणार असल्याचे कळते आहे. जर मनसेला एकही स्वीकृत नगरसेवक पद दिलं नाही तर राज ठाकरेंचा पक्ष काय भूमिका घेणार याबद्दलही राजकारणात उत्सुकता आहे. 

एकनाथ शिंदेंची राज ठाकरेंनी भेट का घेतली, कारण कळाले

BMC मध्ये कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आलेत ?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे 89 आणि शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. या दोन्ही पक्षांची युती असल्याने या दोन पक्षांच्या युतीला सत्तेत बसण्याचा मान मिळाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत तर मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसचे 24 नगरसेवक निवडून आले असून AIMIM पक्षाचे 8 नगरसेवक निवडून आलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 3, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आणि समाजवादी पक्षाचे 2 नगरसेवक यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झाले आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com