अमोल सराफ, प्रतिनिधी
Farmer Death : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या सत्र पुन्हा डोकं वर काढत आहे. शेतकरी पुत्र असू दे किंवा युवा शेतकरी किंवा वयोवृद्ध शेतकरी, कर्जबाजारीपणाच्या बोज्यामुळे हे आपलं आयुष्य संपवत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी गळफास घेतल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे एका ६० वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात जाऊन बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 29 डिसेंबर रोजी अंत्री खेडेकर येथे सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.
अंधेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंत्री खेडेकर येथील रहिवासी असलेले रतन लक्ष्मण चांदले यांच्याकडे अंत्री खेडेकर शेती शिवाऱ्यात गट नंबर 10 83 मध्ये कोरडवाहू जमीन आहे. या जमिनीवर त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मेरा खुर्द शाखेकडून पीक कर्ज घेतले होते. तसेच त्यांच्या पत्नीच्या नावाने शेती असल्याने पीक कर्ज घेतले होते. मात्र यावर्षी शेतात पिकाची उत्पन्न पाहिजे तसेच झाले नाही. म्हणून बँकेचे कर्ज कसे फेडावे याची चिंता रतन चांदले यांना काढली होती. घरची परिस्थिती फार हालाखीची असल्याने घरातील सर्वजण शेत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदारनिर्वाह भागवत असतात. एकीकडे घरची हालाखीची परिस्थिती आणि दुसरीकडे बँकेच्या कर्जाची परतफेड या भीतीपोटी रतन चांदले हे घरात नैराश्यामध्ये जीवन जगत होते. 29 डिसेंबर रोजी सकाळी शेतात जातो असं म्हणून ते घरातून निघाले आणि शेतातील एका बाभळीच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.
पत्नीकडून शोधाशोध...
पती शेतात केले आहे मात्र घरी परत का आले नाही. म्हणून पत्नी शोध घेण्यासाठी शेतात गेली. पतीला बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून पत्नीला धक्काच बसला. तिने लगेच धावत जाऊन पतीला घट्ट मिठी मारून मोठ्याने आरडाओरडा केला. ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील शेतकरी धावत गेले. घडलेली घटना पाहून सरपंच सचिन खेडेकर, पोलीस पाटील रामदास मोरे, कोतवाल मोरे यांना या घटनेची माहिती दिली. या घटनेमध्ये घरातील करत्या पुरुषाचं छत्र हरपलं. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, भाऊ यांच्यावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्याच दिवशी घडली दुसरी घटना..
दुसरबीड तालुक्यातील साखरखेडा पोलीस ठाणे अंतर्गत मलकापूर पांगरा शिवारात 29 डिसेंबर रोजी बाबुराव श्रीराम देशमुख वय वर्ष 61 या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 29 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास बाबुराव देशमुख नेहमीप्रमाणे शेतातील मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. काही वेळाने ते शेतातील उंबराच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना कळविण्यात आलं. साखरखेडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. या प्रकरणी मर्ग क्रमांक 37 20 25 कलम 194 बी एन एच एस अन्वये नोंद करण्यात आली आहे. मृत शेतकऱ्यावर बँकेचं तसेच खाजगी कर्ज होतं. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतातील पीक हातातून गेल्याने ते मानसिक तणावात होते, अशी माहिती फिर्यादी अमोल संजय राव देशमुख यांनी दिली आहे. मृत्यू बाबत कोणतीही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास साखरखेडा पोलीस करीत आहे.
जिल्ह्यात दोन दिवसात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या..
मागील दोन दिवसाचा विचार केला तर जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये एका युवा शेतकऱ्याचा देखील समावेश आहे. शेतकरी आत्महत्या रोखणं हे सरकारसमोरील मोठं आव्हान आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
