जाहिरात

Buldhana Accident News: होळीच्या दिवशी काळाचा घाला! शाळेत जाताना शिक्षिकेचा अपघाती मृत्यू

Buldhana News: जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षिका वृषाली गावंडे यांचा शाळेत जात असताना अपघातात मृत्यू झाला. दूध संकलन केंद्राच्या गाडीने दिलेल्या धडकेमुळे हा अपघात घडला.

Buldhana Accident News: होळीच्या दिवशी काळाचा घाला! शाळेत जाताना शिक्षिकेचा अपघाती मृत्यू

अमोल सराफ, बुलडाणा

बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या कर्तव्यावर जात असलेल्या एका तरुण शिक्षिकेचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. होळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. जळगाव जामोद तालुक्यात एक भीषण अपघात घडला असून, यामध्ये एका कर्तव्यदक्ष शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला आहे. पातुर्डा बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या वृषाली प्रकाश गावंडे (वय 35) या जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. 

टेम्पोची जोरदार धडक

मिळालेल्या माहितीनुसार, वृषाली गावंडे या 2 मार्च रोजी सकाळी आपल्या स्कुटीने पिंपळगाव काळे येथील शाळेवर जात होत्या. कवठळ-भेंडवळ रोडवर पाठीमागून येणाऱ्या एका दूध संकलन केंद्राच्या 'सेंट्रो' गाडीने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, वृषाली गावंडे खाली पडल्यानंतर गाडीचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घाबरलेला चालक गाडीसह घटनास्थळावरून पसार झाला.

(नक्की वाचा-  Crime News: नाशिक हादरलं! विवाहितेचा 2 लाखांत 'सौदा'; इव्हेंटच्या नावाखाली नेलं अन् पुढे भयंकर घडलं)

पोलीस तपास आणि कारवाई

घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोदचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय स्नेहा शेंडगे, पोलीस हवालदार मानकर आणि मस्के यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव जामोद येथील रुग्णालयात पाठवला. फरार चालकाचा आणि संबंधित वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत.

(नक्की वाचा-  T20 World Cup: ...तर सामना न खेळताच भारत विश्वचषकातून बाहेर होणार? काय आहे ICC चा नियम?)

वृषाली गावंडे या अत्यंत मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष शिक्षिका म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे पातुर्डा गावासह शैक्षणिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com