जाहिरात
Story ProgressBack

राजा कायम राहणार की बदलणार? भेंडवळच्या घटमांडणीचं भाकीत काय असेल? जनतेत उत्सुकता

या घटमांडणीच्या भाकितामध्ये देशाचा राजा कायम राहणार की बदलणार? याबाबत काय भाकीत होते, याबाबत याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Read Time: 4 min
राजा कायम राहणार की बदलणार? भेंडवळच्या घटमांडणीचं भाकीत काय असेल? जनतेत उत्सुकता
बुलढाणा:

प्रतिनिधी, अमोल गावंडे

जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे सुमारे 350 वर्षांपूर्वीपासून महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी अक्षयतृतीयेच्या घट मांडणीला सुरुवात केली असून आता ही परंपरा त्यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज वाघ परंपरा जोपासत आहेत. भेंडवळच्या घटमांडणीत अक्षयतृतीयेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे चालू वर्षातील पीक परिस्थिती, पाऊस, सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचे भाकीत वर्तविण्यात येते. घटमांडणीत पानविडा ठेवण्यात येतो. यातील पान म्हणजे राजगादी आणि सुपारी म्हणजे राजाचे प्रतिक मानल्या जाते. सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा धुमधडाका सुरू आहे. इंडिया आघाडी व एनडीएमध्ये देशाच्या सत्तेसाठी घमासान सुरू आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून 2024 लागणार आहे. तत्पूर्वी 10 मे रोजी अक्षयतृतीयेच्या सायंकाळी होणाऱ्या घटमांडणीचे 11 मे रोजी पहाटे निरीक्षण करून करण्यात येणाऱ्या भाकिताला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. 

या घटमांडणीच्या भाकितामध्ये देशाचा राजा कायम राहणार की बदलणार? याबाबत काय भाकीत होते, याबाबत याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर मागील वर्षीच्या घटमांडणीत राजा कायम राहणार असल्याचे भाकीत करण्यात आले होते. हे उल्लेखनीय.भेंडवळ येथील घटमांडणीत यंदाचे पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत दरवर्षी भविष्यवाणी करण्याची परंपरा आहे. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागून असलेल्या 'भेंडवळची घटमांडणी'चे भाकीत 11 मे रोजी पहाटे वर्तविण्यात येणार आहे.  घटमांडणीत वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरुन राज्यातील शेतकरी आपल्या वर्षभराचं पीक पाण्याचे नियोजन करत असतात. त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असते. यंदाची पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक, संरक्षण व सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणाऱ्या या भेंडवळची घटमांडणीतून अंदाज  व्यक्त होणार आहेत. तर आता लोकसभा निवडणुकीमुळे राजा कायम राहणार की नाही, याबाबतच्या भाकिताबद्दल जनतेमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

नक्की वाचा - Video : मतदार असावा तर असा! दोन्ही हात नाहीत तरी तरुणानं पायानं केलं मतदान

अशी होते घटमांडणी.....
अक्षय तृतीयेच्या सायंकाळी भेंडवळ गावालगतच्या शेतात परंपरेनुसार घटमांडणी करण्यात येते. यामध्ये शेतात मध्यभागी खोल खड्डा करुन त्या खड्ड्यात मातीचा घट मांडण्यात येतो. घटाखाली चार मातीची ढेकळं ठेवण्यात येतात. ही मातीची चार ढेकळं म्हणजे पावसाचे चार महिने, त्यावर पाण्याने भरलेली घागर म्हणजेच घट आणि घागरीवर असलेला पापड म्हणजे पृथ्वी, सोबतच भजा, वडा, सांडोई, कुरडई ठेऊन घटाच्या बाजूला पान सुपारी म्हणजे गादी व राजा यासह घटाच्या वर्तुळाकार  गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा अशी विविध 18 प्रकारची धान्ये मांडून पिकपाण्याचे भविष्य वर्तविण्यात येते.

राजा कायम राहणार काय?....
भेंडवळच्या घटमांडणीत राजकीय परिस्थितीचे भाकीत करण्यात येते. घटमांडणीत ठेवलेल्या पानविडा व सुपारी यावरून देशाचा राजा कायम राहणार की बदलणार? याबाबत भाकीत करण्यात येते. पानावरील सुपारी जैसे थे राहिल्यास राजा कायम तर हलल्यास राजा बदलणार असे  राजकीय परिस्थितीबाबत भाकीत वर्तविण्यात येते.

मागील वर्षीचे भाकित.....
पावसाबाबत- जून महिन्यात कमी पाऊस त्यामुळे पेरणी उशिरा, जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस, ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस व अतिवृष्टी, सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पण अवकाळी पाऊस भरपूर व पिकांचे नुकसान होईल

पिकांबाबत- पिकांवर रोगराई राहिल, कापूस पीक मध्यम होईल व भावात तेजी असेल, ज्वारी सर्वसाधारण, तूर पीक चांगले, मूग पीक सर्वसाधारण, उडीद मोघम, तीळ सर्वसाधारण, बाजरी सर्व साधारण मात्र या पिकांची नासाडी होईल, गहू सर्वसाधारण पण बाजार भाव तेजीत राहिल, हरभरा कमी जास्त पीक येईल.

देशासंबंधी- संरक्षण मजबूत राहील मात्र शेजारील देशाची घुसखोरी राहील, देशाची आर्थिक परिस्थिती खालावेल, चढउतार होईल.

राजकीय अंदाज- राजा कायम राहील, पण राजाला अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच राजा कायम तणावात असेल व राजकीय उलथापालथ होत राहील.

अंनिसचा विरोध...
भेंडवळची घटमांडणीची राज्यभरात चर्चेचा विषय ठरत असली तरी दुसरीकडे मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून याला विरोध होत आला आहे.भेंडवळची घटमांडणी म्हणजे फक्त ठोकताळे असतात. भेंडवळच्या घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी या भेंडवळच्या घटमांडणीवर कुठलाही विश्वास ठेवू नये, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शेतकऱ्यांना आवाहन केले जाते. मागील कित्येक वर्षापासून भेंडवळची घट मांडणीची भाकितं चुकीची ठरत असल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून केला जात आहे. त्यामुळे भेंडवळ घटमांडणी श्रध्दा व अंधश्रध्देच्या गर्तेत अडकल्याचे दिसून येते.

(वरील बातमीतून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. मात्र गेल्या 350 वर्षांपासून सुरू असलेल्या भेंडवळ घटमांडणीच्या प्रथेवर शेतकऱ्यांचा विश्वास असल्याचं दिसतं)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination