
Bullet Train: देशातील महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरु आहे. मात्र पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा प्रकल्प डोकेदुखी बनला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बोगदा खोदण्यासाठी करण्यात येत असलेल्या स्फोटांमुळे सफाळेजवळील जलसार गावातील 200 हून अधिक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगत असून, प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
स्फोटांमुळे भूकंपासारखी परिस्थिती
गेल्या काही दिवसांपासून जलसार गावाजवळच्या डोंगरात बोगदा तयार करण्यासाठी सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात स्फोट घडवले जात आहेत. या स्फोटांच्या धक्क्यांमुळे परिसरातील घरांच्या भिंतींना भेगा पडणे, घरातील प्लास्टर निघून पडणे, छपरांचे नुकसान होणे असे प्रकार घडत आहेत. इतकेच नाही, तर काही घरांच्या अंगणातील पाण्यासाठी असलेल्या बोअरवेलही भू-सुरुंग स्फोटामुळे नादुरुस्त झाल्या आहेत. स्फोटांमुळे घरांच्या खिडक्या आणि दरवाजे थरथर कापतात आणि भूकंपाप्रमाणे परिस्थिती निर्माण झाल्याने लोक जीव मुठीत घेऊन राहत आहेत.
(नक्की वाचा- Police Bharati News: राज्यात 14 हजार पदांसाठी पोलीस भरती; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय)

गावातील सरपंच आणि रहिवाशांशी संवाद साधला असता, त्यांनी आपली व्यथा मांडली. ग्रामस्थांनी सांगितले की, आयुष्यभराची कमाई लावून बांधलेल्या त्यांच्या स्वप्नातील घरांचे कायमचे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा सुरू केला आहे. मात्र, नुकसान भरपाईबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
(नक्की वाचा- Pune Metro Daily Pass: कुठेही, कितीही वेळा फिरा; फक्त 100 रुपयांत! गणेशोत्सवापूर्वी पुणे मेट्रोची भन्नाट योजना)
कंत्राटदार कंपनीने केवळ 65 घरांचे नुकसान झाल्याचे मान्य करून, त्यांची डागडुजी करून देण्याचे आश्वासन दिले आहे. पण, नागरिकांचे म्हणणे आहे की, केवळ डागडुजीने कायमस्वरूपी झालेले नुकसान भरून निघणार नाही. या घटनेवर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन, बाधित ग्रामस्थांना योग्य आणि ठोस मोबदला द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. विकास प्रकल्पांमुळे लोकांचे जीवन अधिक सुरक्षित होणे अपेक्षित असताना, तोच त्यांच्यासाठी धोका ठरत आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world