मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्याचं राजकारण पेटलं आहे. राज्यात शांतता टिकून राहिली पाहिजे, यासाठी पुढाकार घेऊन शरद पवारांनी भूमिका घेतली पाहिजे. यासाठी शरद पवार यांची भेट (Chhagan Bhujbal - Sharad Pawar meeting) घेतल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छगन भुजबळ यांनी याबाबत म्हटलं की, मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठा-ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला आहे. राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे की राज्यात शांतता राहायला हवी. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनावेळी देखील तुम्ही महत्त्वाची भूमिका घेतली होती.
(नक्की वाचा - भुजबळ भाषणाला उभे राहीले, मराठा समाजाने काय केले? दादांच्या बारामतीत काय झाले?)
मात्र मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा केली याची आम्हाला माहिती नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं. जरांगे यांना जे मंत्री भेटले त्यांनी काय सांगितलं हे देखील मला माहित नाही, असंही शरद पवारांनी म्हटलं. मात्र तुम्ही याबाबत विचारणा करायला हवी.
राज्यातील परिस्थितीचा तुम्हाला सर्वाधिक अभ्यास आहे. जिल्ह्यात गावांमध्ये काय परिस्थिती आहे याचा तुम्हाला अंदाज आहे. आम्ही मंत्री झालो म्हणजे आम्हाला याचा खूप अभ्यास आहे, असं नाही. त्यामुळे तुम्ही आता पुढाकार घेतला पाहिजे, असं आवाहन छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना केलं.
(नक्की वाचा- 'बघून येतो...' बोलून गेलेले भुजबळ वर्षभराने शरद पवारांच्या भेटीला, तो फोनचा किस्सा पुन्हा चर्चेत)
शरद पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
यावर शरद पवारांनी म्हटलं की, मी एक दोन दिवसात स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलतो आणि दोन-चार तज्ज्ञांशी एकत्र बसून चर्चा करतो. प्रश्न कसा सोडवता येईल यासाठी मी चर्चा करायला तयार आहे, असा शब्द शरद पवारांनी दिला आहे.
राज्यातील वातावरण शांत करण्यासाठी कुणालाही भेटायला तयार
मराठा-ओबीसी आरक्षणावरुन तंग झालेलं वातावरण शांत झालं पाहिजे ही माझी भूमिका आहे. यासाठी मी कुणालाही भेटायला तयार आहे. यात राजकारण नाही. राज्यातील परिस्थिती निवळण्यासाठी कोणालाही विनंती करायला मला थोडाही कमीपणा वाटणार नाही. शरद पवारांना भेटणार असल्याची माहिती प्रफुल पटेल यांना दिली होती. प्रफुल्ल पटेल यांनी देखील मला जा असं सांगितलं, असं ही भुजबळांनी सांगितलं. , असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.