छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीचा मृतदेह रिक्षामध्ये गादीत गुंडाळून नेला जात असताना पोलिसांनी पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार आत्महत्या आहे की हत्या, याबाबत आता गूढ वाढले आहे.
वाळूज पोलीस परिसरातील तिसगाव चौफुली भागात गस्तीवर असताना त्यांना एका रिक्षाची हालचाल संशयास्पद वाटली. रिक्षामध्ये घरगुती सामान भरलेले होते, मात्र त्या सामानामध्ये एक गादी विचित्र पद्धतीने गुंडाळून ठेवली होती. पोलिसांनी रिक्षा अडवून विचारपूस केली आणि गादी उघडून पाहिली असता, पोलिसांनाही धक्का बसला. त्या गादीत तरुणीचा मृतदेह लपवलेला होता.
(नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: फॉर्ममधील एक प्रश्न अन् लाखो महिला अपात्र! लाडकी बहीण लाभार्थ्यांची संख्या 86 लाखांनी घटली)
सावत्र आईचा खळबळजनक दावा
पोलिसांनी तातडीने तरुणीच्या पालकांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत तिच्या सावत्र आईने सांगितले की, मुलीचे कोणाशी तरी प्रेमसंबंध होते, त्या कारणावरून तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीने आत्महत्या केल्याचे कोणाला समजले तर बदनामी होईल, या भीतीने आम्ही कोणालाही न सांगता तिचा मृतदेह गादीत गुंडाळला आणि अंत्यसंस्कारासाठी गावी घेऊन जात होतो, असा दावा पालकांनी केला आहे.
(नक्की वाचा- Pune News: पुण्यात 'मुले पळवणारी टोळी' सक्रिय? पुणे पोलिसांचे नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी)
घातपाताचा संशय आणि तपास
पालक जरी आत्महत्येचा दावा करत असले, तरी पोलिसांना मात्र हा घातपाताचा प्रकार वाटत आहे. मृतदेह अशा प्रकारे चोरून नेण्यामागचे कारण काय? जर ही आत्महत्या होती, तर पोलिसांना का कळवले नाही? मृतदेहावर जखमांच्या काही खुणा आहेत का? या सर्व बाबींची पडताळणी करण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलीस या प्रकरणाची 'ऑनर किलिंग'च्या कोनातूनही चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world