बीडमधील मस्साजोग ग्रामपंचायत सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले आहेत. काँग्रेसने आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच सर्व आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानपरिषेदत म्हटलं की, "सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना सरकारने देखील गांभीर्याने घेतली आहे. पोलीस निरीक्षकांला सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. एका पीएसआयला निलंबित केलं आहे. तीन आरोपींना अटक केली आहे. काही आरोपी फरार असले तरी त्यांनी देखील लवकर अटक केली जाईल."
"विरोधी पक्षनेत्यांना मी एवढंच सांगतो की, आरोपी कुणाशी संबंधित आहे याचा विचार न करता घटनेशी संबधित असेल त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल. ही केस सीआयडीला ट्रान्सफर केली आहे. तिथे एक एसआयटी स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मार्फत चौकशी करुन यामागे जे कुणी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितलं.
AI चा तपासात वापर करणार : CM फडणवीस
"मात्र मंत्र्याच्या जवळचे वैगेरे आपण आरोप करते त्यावेळी ज्या मंत्र्यांचा यात काही सहभाग नसताना देखील कुठेतरी अंगुलीनिर्देश होतो. आरोपीला वाचवा असा कुणाचाही दबाव नाही. त्यामुळे जे आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई होईल. तपासासाठी टेक्निकल आणि एआयचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे कुठलाही गुन्हेगार वाचणार नाही", असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
सर्व आरोपींना तात्काळ अटक करा- अंबादास दानवे
बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार 3 आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच या घटनेत दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याची येथील गावकऱ्यांना शंका असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली. संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही दानवे यांनी आज परिषद सभागृहात केली. आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री यांनी दिले.
वाल्मिक कराडच मुख्य आरोपी- जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. "सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येत ज्यांनी नावे येत आहेत ते एका मोठ्या राजकीय नेत्यांच्या जवळचे आहेत. सरकारने SIT नेमून तपासात पारदर्शकता दाखवावी.संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराडच मुख्य आरोपी आहे. वाल्मिक कराड बीडचा छोटा शकील आहे. वाल्मिक कराडला आदेश द्यायचा, त्याने काम वाजवायचं ही परंपरा आजही कायम आहे", असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world