चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत मोठी आग लागली होती. यात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. काही जण जखमी ही झाले आहेत. चेंबूर येथील सिद्धार्थनगरमधील आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
(नक्की वाचा- चेंबूरमध्ये भीषण आग, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना सर्वतोपरी आधार देण्याचा दिलासा दिला.
दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेता यावी यासाठी उपाययोजनांचाही आढावा घेतला जाईल. याठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम रखडले असेल,तर त्याबाबतही बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
(नक्की वाचा - पुणे-पंढरपूर मार्गावरील कार आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, 3 जण जखमी)
नेमकं काय घडलं?
सर्व जण झोपेत असताना एक दुर्घटना घडली. पहाटेच्या सुमारात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली . मात्र सर्व जण झोपेत असल्याने काय घडलं हे समजलंच नाही. ज्यावेळी समजलं त्यावेळी मात्र फार उशीर झाला होता. या आगीच्या घटनेत प्रेसी प्रेम गुप्त (वय 6 वर्ष), मंजू प्रेम गुप्ता (वय 30 वर्ष), अनिती धर्मदेन गुप्ता (वय 39 वर्ष), प्रेम गुप्ता (वय 30 वर्ष), नरेंद्र गुप्त (वय 10 वर्ष), निधी गुप्ता (वय 15 वर्ष) आणि गीता देवी गुप्ता (वय 60 वर्ष) या सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.