महाविकास आघाडीचा आत्मविश्वास लोकसभेतील कामगिरीमुळे वाढला आहे. महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. जागावाटपासंदर्भात महायुतीकडून बैठकांचा सिलसिला देखील सुरु झाला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा काँग्रेसने धसका घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुती जोरदार धक्का देत 48 पैकी 30 जागा जिंकल्या. तर महायुतील अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेस 13 जागा जिंकून राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र महाविकास आघाडीला उद्धव ठाकरे यांना राज्यभर मिळालेल्या सहानुभूतीचा सर्वाधिक फायदा मिळाल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्यामुळे महाविकास आघाडीत कमी जागा मिळूनही शिवसेना ठाकरे गटाचं राजकीय वजन जास्त आहे. या व्यतिरिक्त बोलायचं झालं तर मुस्लीम समाज हा काँग्रेस पारंपरिक मतदार आहे. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईत आणि उर्वरित महाराष्ट्रात देखील मुस्लीम मतदार ठाकरे गटाच्या ताकदीने मागे उभे राहिल्याचं पाहायला मिळालं.
मुस्लीम समाजाच्या रूपाने नवा मतदार
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लीम समाजाच्या रूपाने नवा मतदार लोकसभेत मिळाला. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने ठाकरे गटाला मतदान केल्यामुळेच त्यांच्या अनेक जागा आल्या. शिवसेना हा एकेकाळी कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जायचा आणि त्यामुळे मुस्लीम समाज अंतर राखत होता. मात्र आता चित्र बदललं असून ठाकरेच्या शिवसेनेला मुस्लीम मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे.
(नक्की वाचा- 'कंस मामा राख्या बांधत फिरतायत, दुसरीकडे बहिणीवर अत्याचार ' ठाकरे गरजले)
मित्रपक्ष प्रतिस्पर्धी बनण्याची भिती
मात्र शिवसेनेची ही वाढती ताकद काँग्रेसला नकोशी वाटत आहे. कारण महाविकास आघाडीत राहून मुस्लीम मतदार ठाकरे गटाच्या बाजूने वळल्याने काँग्रेसची धास्ती वाढली आहे. काँग्रेसची भिस्त ही मुस्लीम मतदारांवर असते. मात्र या मतांचं विभाजन झाल्यास आपलाच मित्रपक्ष आपला प्रतिस्पर्धी बनेल अशी भिती काँग्रेसला आहे.
(नक्की वाचा- भर पावसात शरद पवारांचे आंदोलन, कार्यकर्त्यांना दिली शपथ)
काँग्रेसची आक्रमक भूमिका
म्हणूनच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानसभेसाठी काँग्रेस 130 हून अधिक जागांची मागणी केली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या मागणीकडेकडे देखील काँग्रेसने कानडोळा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे एकीचं बळ दाखवणाऱ्या काँग्रेस-ठाकरे गटात धुसपूस सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.