बदलापूर प्रकरणी निषेध आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. यावेळी भर पावसात ठाकरेंनी आंदोलन केले. शिवाय तोंडावर काळ्या पट्ट्या लावून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली. आया बहिणींच्या सुरक्षेसाठी बंद पुकारला होता. त्याला सरकारनेच खोडा घातला असा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला. त्यांना राख्या बांधून घायच्या होत्या. त्यात व्यत्यय येवू नये म्हणून त्यांनी बंद होवू दिला नाही असा गंभीर आरोपही ठाकरेंनी केला आहे. शिवाय आता जाग आली आहे. हे आंदोलन असेच सुरू ठेवा. लाडकी बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित ही मोहिम राबवा असा आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ठाकरेंनी कंस मामाचा केला उल्लेख
महाविकास आघाडीने पुकारलेला बंद हा महिलांच्या सुरक्षेसाठी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी होता. झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी हा बंद होता. पण सरकारने ते होवू दिला नाही. त्यांना राख्या बांधून घ्यायच्या होत्या. त्यात अडचण येवू नये म्हणून आपल्या चेल्याचपाट्यांना कोर्टात पाठवलं. एकीकजे कंस मामा राख्या बांधत फिरतायत, दुसरीकडे बहिणीवर अत्याचार होत आहेत, असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केला. बंद कडकडीत झाला असता. याची जाणिव सरकारला झाली त्यामुळेच त्यांनी तो होवू दिला नाही. हे मुडदाड सरकार आहे. त्यांनी नराधमाच्या विरूद्ध उभे राहाण्या ऐवजी ते त्यावर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच त्यांचा बंदला विरोध होता असा आरोपही त्यांनी केला. हे सरकार काही झाले तरी घालवायचे आहे असेही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - भर पावसात शरद पवारांचे आंदोलन, कार्यकर्त्यांना दिली शपथ
याचिकाकर्ते सरकारचे 'सदा'आवडते
यावेळी त्यांनी बंद विरोधात कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्यांवरही जोरदार टिका केली. गेल्या काही महिन्यापूर्वी भारत बंद करण्यात आला होता. पण त्या विरोधात कोणीही कोणीही कोर्टात गेले नाही. पण इथे काही सरकारचे 'सदा'आवडते आहेत. त्यांच्या माध्यमातून हा बंद होवू नये यासाठी कोर्टात गेले. कोर्टात गेलेले हे सरकारचे चेलेचपाटेच होते, असेही ठाकरे म्हणाले. महिलांवर अत्याचार होतात. या विरोधात आवाज उठवण्यासाठी बंद पुकारला जातो. त्यालाही विरोध केला जातो. अशा वेळी जे याचिकाकर्ते कोर्टात जातात तेही तेवढेच विकृत आहे. जे एखाद्या पापावर पांघरूण घालतात तेही तेवढेच दोषी असल्याचे ठाकरे म्हणाले.
'कोर्ट येवढ्या गतीनं हलू शकतं हे समजलं'
उद्धव ठाकरे यांनी यावेळी कोर्टाला धन्यवाद देत चिमटेही काढले. आमचीही केस कोर्टात गेली दोन वर्षापासून सुरू आहे. त्यावर अजूनही काही निर्णय आलेला नाही. पण बंदच्या केसमध्ये कोर्टाने तात्काळ निर्णय दिला. त्यांचे त्याबद्दल आभार मानतो. कोर्ट इतक्या जलद गतीने हलू शकते ही ही या निमित्ताने समजले असे ठाकरे म्हणाले. कोर्ट तात्काळ निर्णय घेवू शकतं हे या निमित्ताने सांगितले. आम्हाला मात्र तारीख पे तारीख मिळत आहे हे सांगायला ते यावेळी विसरले नाहीत.
ट्रेंडिंग बातमी - आधी बदलापुरात सहानुभूती मग उल्हासनगरात जाऊन हातावर मेहंदी, चाकणकरांचं चाललंय काय?
'बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित'
हे आंदोलन थांबता कामा नये असे आदेश उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना दिले आहे. तुमच्या गावात, तालुक्यात, शहरात जिथे असेल तिथे एक अभियान राबवा. बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित. यावर लोकांच्या स्वाक्षऱ्या घ्या.या स्वाक्षऱ्या आपण दिल्लीला कोर्टात पाठवणार आहोत असे ठाकरे म्हणाले. त्यातून आम्ही बंद का करत होतो हे कोर्टाला सांगणार असल्याचे ते म्हणाले. आमचा आवाज बंद करता येणार नाही. तसं झालं तर तो आवाज आणखी मोठा होईल असे ठाकरे म्हणाले. शक्ती कायदा महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झाला. तो आता राष्ट्रपतींकडे धुळ खात पडला आहे. तो मंजूर करावा असे ठाकरे यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world