
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या, राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास 10 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील विविध वर्गवारीसाठी प्रवेशिका सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑगस्ट हा होता. मात्र गणेशोत्सव, पाऊसमान आणि इतर बाबीमुळे काही नाट्यसंस्था व संघटनांनी या प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केलेली होती.
जास्तीत जास्त संघाना या स्पर्धेत भाग घेता यावा यासाठी, प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य संचालनालयास केली होती. या सूचनेच्या अनुषंगाने प्रवेशिका सादर करण्यास दिनांक 10 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली आहे.
या मुदतवाढ निर्णयाच्या अनुषंगाने, राज्य नाट्य वर्गवारींच्या स्पर्धांत भाग घेण्यास इच्छुक असलेले संघ, ऑनलाइन पद्धतीने दिनांक 10 सप्टेंबर पर्यंत प्रवेशिका सादर करू शकतील असे प्रसिद्धीपत्रक सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे. संबंधित संघानी https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world