Devendra Fadnavis on Election Result : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असल्याचे लक्षात आल्यामुळेच विरोधक प्रचाराच्या मैदानातून बाहेर पडले किंवा ते कमी पडले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
पराभव झाला आहे हे लोकांना कळले तर आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेत कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचेल, या भीतीने विरोधक आता आम्ही ही निवडणूक गांभीर्याने घेतली नव्हती असे सांगून पळवाट शोधत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पक्षाला दारे असूच नयेत, पक्ष हा बिनदाराचाच असावा, असे सांगतानाच प्रवेश देणारी व्यक्ती योग्य आहे की नाही, हे तपासूनच पक्षात घेतले जाते आणि त्याचा पक्षाला फायदाच झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नगरपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
( नक्की वाचा : Nagarparishad Result 2025 : मुंबईच्या मोहात ठाकरेंनी बालेकिल्ले गमावले; नगरपालिका निकालातून धोक्याची घंटा )
विरोधकांच्या रणनीतीवर बोचरी टीका
निवडणुकीच्या निकालांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, विरोधकांना आपली हार आधीच उमजली होती. जर त्यांनी ही निवडणूक ताकदीने लढवली असती आणि त्यात त्यांचा पराभव झाला असता, तर पुढील मोठ्या निवडणुकांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह उरला नसता. त्यामुळेच आम्ही सीरिअस नव्हतो, असे सांगून विरोधक आपली सुटका करून घेत आहेत.
मात्र, ही निवडणूक तळागाळातील कार्यकर्त्यांची होती आणि त्यांना वाऱ्यावर सोडणे भाजपला मान्य नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जे कार्यकर्ते कष्ट करतात, त्यांच्या निवडणुकीत काम न करणे हा करंटेपणा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
( नक्की वाचा : Ausa Nagar Parishad Result 2025 : फडणवीसांच्या 'खास' आमदाराचा 'होम ग्राऊंड'वर पराभव; औशात गुलाबी गुलालाची उधळण )
इनकमिंगवर काय म्हणाले मुख्यमंत्री?
पक्षाच्या विस्ताराबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत आहे, मात्र त्या व्यक्तीची पात्रता तपासणे आवश्यक आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जिथे कुठे ताकद कमी पडली असेल, ती आगामी महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने दिली जाईल.
भाजपाने या निवडणुकीत 100 टक्के सकारात्मक प्रचार केला असून कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक टीका करणे टाळले आहे. मतदारांनी याच सकारात्मकतेला कौल देत भाजपाला राज्याचा नंबर वन पक्ष म्हणून पुन्हा निवडून दिले आहे.
2014 पासूनची विजयाची परंपरा
2014 नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजप शहर आणि ग्रामीण भागात विजयी झाला आहे. 2024 च्या लोकसभेत जरी कामगिरी काहीशी खालावली असली, तरी पक्षाची मते कमी झाली नव्हती, उलट ग्रामीण भागात चांगली मते मिळाली होती. भाजप हा सर्व जाती आणि समाजाला सोबत घेऊन जाणारा पक्ष असून महाराष्ट्रात भाजपचे स्थान प्रथम क्रमांकावर असल्याचे सिद्ध झाले आहे.
राज्यात भाजपचे 3300 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले असून, एकूण नगरसेवकांपैकी हे प्रमाण 48 टक्के इतके मोठे आहे. या घवघवीत यशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील निकालांचे विश्लेषण
रत्नागिरीमध्ये महायुती म्हणून एकत्र लढल्यामुळे मोठे यश मिळाले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. मात्र, सिंधुदुर्गात काही ठिकाणी युती होऊ शकली नाही, त्यामुळे तिथे काही जागांवर विजय मिळाला तर काही ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. राज्याच्या इतर भागात मात्र भाजपने जिथे जिथे निवडणूक लढवली, तिथे विजय मिळवून आपले वर्चस्व कायम राखले आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात यावेळी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world