जाहिरात

धारावीकरांच्या मनातील संभ्रम होणार दूर, 'या' नंबरवर कॉल करा आणि विचारा प्रश्न

धारावीकरांच्या मनातील संभ्रम होणार दूर, 'या' नंबरवर कॉल करा आणि विचारा प्रश्न
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

पुनर्विकास प्रक्रियेची पहिली पायरी असलेल्या सर्वेक्षणाबाबत धारावीतील रहिवाशांच्या मनातील शंकांचे निरसन करून या प्रक्रियेत रहिवाशांचा सहभाग वाढविण्याच्या हेतूने धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट (डीआरपी) ने जागरूकता मोहिमेला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून सर्वेक्षणपूर्व जागरूकता अभियान, विविध ठिकाणी रहिवाशांच्या छोटेखानी सभा आणि समर्पित कॉल सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. 

काय आहे मोहीम?

डीआरपीच्या कॉल सेंटर मधून धारावीतील रहिवाशांना सध्या धारावीत सुरू असलेल्या सर्वेक्षणाबाबत माहिती देऊन त्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात येत आहे. या कॉल सेंटरमधील 10 टेलीकॉलर्स मराठी, हिंदी, तामिळ, गुजराती आणि इंग्रजी भाषेतून रहिवाशांशी संवाद साधत आहेत. 

"पात्रता, सर्वेक्षणासाठी आवश्यक दस्तावेज आणि पुनर्विकासात रहिवाशांचा हक्क या विषयीच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी धारावीकरांनी 1-800-268-8888 या टोल फ्री क्रमांकाचा प्रभावीपणे वापर करावा, असे आम्ही आवाहन करतो. जास्तीत जास्त रहिवाशांपर्यंत पोहोचता यावे, यासाठी आम्ही जास्तीत जास्त कॉल्स करण्याचा प्रयत्न करत आहोत.

हे जनअभियान यशस्वी करण्यासाठी धारावीकरांच्या सकारात्मक सहभागाची अपेक्षा आहे" अशी प्रतिक्रिया डीआरपी - एसआरएमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तसेच, आपल्या मनातील सर्व शंका दूर करण्यासाठी रहिवाशांनी या सुविधेचा वारंवार आणि काळजीपूर्वक लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

( नक्की वाचा : देवेंद्र फडणवीसांचे धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत मोठे वक्तव्य )
 

लोकसहभागाचा प्रभावी वापर

रहिवाशांना विश्वासात घेऊन त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचविण्यासाठी डीआरपीच्या वतीने सातत्याने विविध समुदायातील नेते आणि महत्त्वाच्या प्रभावी लोकांसोबत छोटेखानी सभांचे आयोजन करण्यात येते. रहिवाशांपर्यंत उचित माहिती पोहोचविण्यासाठी या महत्त्वाच्या लोकांची भूमिका नेहमीच निर्णायक ठरते. अशा प्रकारच्या लोकसहभागामुळे सर्वेक्षण प्रक्रियेबाबत पसरवल्या जाणाऱ्या अपप्रचाराला रोखणे शक्य झाले आहे. 

रहिवाशांसोबत थेट संवाद साधतानाच डीआरपीच्या वतीने विविध पातळ्यांवर  लोकप्रबोधनाची प्रक्रिया सुरू आहे. यात रहिवाशांच्या घरी जाऊन थेट गाठभेट करणे, माहितीपर पत्रकांचे वाटप करणे, झोपडपट्ट्यांमधील विविध सोसायट्यांना भेट देणे अशा उपक्रमांचा समावेश आहे. "आम्ही विविध माध्यमांतून धारावीकरांना योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. धारावी पुनर्विकास प्रकल्प, त्याचे फायदे आणि या प्रचंड मोठ्या प्रकल्पाची पहिली पायरी असलेली सर्वेक्षण प्रक्रिया याविषयी आम्ही लोकप्रबोधन करत आहोत. धारावीकरांनी देखील पुढाकार घेत सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य करायला हवे"  असे मत डीआरपी- एसआरएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. 

( नक्की वाचा : 'लोक विकास' उपक्रमामार्फत धारावीकरांची कल्याणकारी सरकारी योजनांअंतर्गत नोंदणी )
 

70 हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण

डीआरपी- एसआरएच्या अधिकाऱ्यांच्या मते, कोणत्याही सेक्टर मध्ये सर्वेक्षण सुरू करण्यापूर्वी रहिवाशांना या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी अनेक पूर्व प्रक्रिया राबवल्या जातात. एखाद्या समुदायातील प्रभावशाली व्यक्ती शोधणे,  रहिवाशांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी छोटेखानी सभांचे आयोजन करणे, माहितीपर पत्रकांचे वाटप करणे, अशा अनेक प्रक्रिया राबविल्या जातात. सर्वेक्षण होणार असेल त्याठिकाणी सर्वेक्षणाची नोटीस आणि पोस्टर्स मोक्याच्या जागी लावून रहिवाशांना त्याबाबत अवगत केले जाते. आजवर धारावीतील विविध सेक्टर मधील सुमारे 79000 गल्यांमधील  70000 हून अधिक घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. 

सर्वेक्षण प्रक्रियेतील सगळ्यात किचकट टप्पा म्हणजे रहिवाशांचे दस्तावेज गोळा करणे. सर्वेक्षण अधिकारी रहिवाशांच्या दस्तावेजांचे फोटो काढून रहिवाशांनी स्वप्रमाणित केलेल्या प्रती पुढील कारवाईसाठी कार्यालयात पाठवतात. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी अधिकाऱ्यांकडून रहिवाशांना सर्वेक्षण पावती देण्यात येते. मात्र, रहिवाशांच्या या माहितीचा दुरुपयोग होत असल्याचा अपप्रचार काही लोकांकडून केला जात आहे.

या अपप्रचाराबाबत बोलताना डीआरपी- एसआरए अधिकाऱ्यांनी सांगितले की," हे दस्तावेज स्कॅन करून त्यांचे सुरक्षित जागी जतन केले जाते. त्यामुळे या दस्तावेजांच्या दुरुपयोगाचा प्रश्नच उद्भवत नाही. त्या दस्तावेजांचा वापर केवळ सर्वेक्षण आणि पुनर्विकास प्रक्रियेसाठीच केला जाईल, त्याबाबत रहिवाशांना आश्वस्त करण्यात आले आहे"
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com