जाहिरात

Dharavi Project : सर्वेक्षणाची अंतिम मुदत हा शासकीय कामकाजाचा भाग, धारावीकरांना संभ्रमित करू नका : राहुल शेवाळे

धारावी पुनर्विकास प्रकल्प हा केवळ पुनर्वसन प्रकल्प नसून धारावीकरांचा सर्वांगीण विकास करणारा प्रकल्प आहे. धारावीतील प्रत्येकाला घर देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे देखील राहुल शेवाळे यांनी आपल्या खुल्या पत्रात नमूद केले आहे. 

Dharavi Project : सर्वेक्षणाची अंतिम मुदत हा शासकीय कामकाजाचा भाग, धारावीकरांना संभ्रमित करू नका : राहुल शेवाळे

Mumbai News : पुनर्विकासासाठी धारावीत सुरू असलेल्या सर्वेक्षणाची अंतिम मुदत निश्चित करणे, हा शासकीय कामकाजाचा भाग आहे.  विरोधकांनी याविषयी राजकारण करू नये, असा थेट सल्ला माजी खासदार राहुल शेवाळे यांनी खासदार वर्षा गायकवाड यांना दिला आहे. 'एक्स ' समाजमाध्यमावर एक खुले पत्र जाहीर करत शेवाळे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सर्वेक्षणाबाबतची भूमिका मांडली आहे. 

शेवाळे यांनी आपल्या खुल्या पत्रात लिहिले आहे की, 40 वर्षे धारावीवर एकहाती सत्ता असूनही त्यांना जे जमलं नाही ते महायुती सरकारने करून दाखवलं. त्यामुळे वर्षाताई गायकवाड यांची चिडचिड होत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा एकमेव असा प्रकल्प आहे , ज्या प्रकल्पात 'अपात्र ' रहिवाशांना देखील सामावून घेतले जाणार आहे. यासाठी सुरू असलेल्या शासकीय सर्वेक्षणात आजवर 1 लाखाच्या आसपास घरांवर शास्त्रीय पद्धतीने क्रमांक टाकण्यात आला आहे. 

(नक्की वाचा-  अंतिम मुदत संपली; असहकार पुकारणाऱ्या धारावीकरांना मुदतवाढ नाही)

यावरून स्थानिकांचे समर्थन दिसून येते. मात्र, राजकीय हेतूने प्रेरित होऊन किंवा वैयक्तिक कारणासाठी ज्या स्थानिकांनी अद्यापही सर्वेक्षणात सहभाग नोंदवला नाही, त्यांच्या संदर्भात कायदेशीर मार्गाने पुढील कारवाई केली जाईल. सर्वेक्षणात सहभागी होण्याची 15 एप्रिलची अंतिम मुदत परस्पर ठरवली नसून हा शासकीय कारवाईचा एक भाग आहे. तसेच, जास्तीत जास्त लोकांना सामावून घेण्यासाठी शासनाने वेळोवेळी अंतिम मुदत पुढे ढकलली होती. त्यामुळे आता विरोधकांनी यावरून राजकारण करून धारावीकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार करू नये, असा सल्ला शेवाळे यांनी दिला.

धारावी पुनर्विकास प्रकल्प हा केवळ पुनर्वसन प्रकल्प नसून धारावीकरांचा सर्वांगीण विकास करणारा प्रकल्प आहे. धारावीतील प्रत्येकाला घर देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे देखील राहुल शेवाळे यांनी आपल्या खुल्या पत्रात नमूद केले आहे. 

(नक्की वाचा-  Dharavi : धारावीतील वरच्या मजल्यावरील कुटुंबाला मिळणार लाभ, शपथपत्र मागविण्याबद्दल दिलं स्पष्टीकरण)

या प्रकल्पाच्या माध्यमातून धारावीकरांना आपले भविष्य घडवण्याची संधी आली असून केवळ राजकीय स्वार्थासाठी या प्रकल्पात खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप शेवाळे यांनी केला. धारावी पुनर्विकास हे केवळ एका व्यक्तीचे स्वप्न नसून हा लाखो कुटुंबाच्या भविष्याचा प्रश्न आहे.धारावीकरांच्या उज्वल भविष्याआड कोणतेही राजकारण येऊ देणार नाही, असा शब्दही शेवाळे यांनी या पत्रातून धारावीकरांना दिला आहे.