Dhurandhar 2: 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम नक्की कुठे आहे? तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 'धुरंधर 2' या चित्रपटामुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. अनेक दशकांपासून लपून बसलेल्या भारताच्या सर्वात मोठ्या गुन्हेगाराचा छडा अद्याप लागलेला नाही, मात्र ताज्या घडामोडींनी या प्रकरणातील उत्सुकता शिगेला नेली आहे.
भारतातून दाऊदचे पलायन हे काही गुपित राहिलेले नाही. 'बडे साहेब' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाऊदने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने देश सोडला होता. 80 च्या दशकात तो दुबईत उघडपणे राहत असल्याचे अनेक अहवाल सांगतात. तिथे तो आलिशान आयुष्य जगत होता, बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पार्ट्यांमध्ये दिसत होता आणि शारजाहमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांचा आनंद घेत होता. त्यावेळी दुबई प्रशासनाने त्याच्या उपस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नेहमीच केला जातो.
कराची हेच सुरक्षित ठिकाण?
1993 च्या भीषण बॉम्बस्फोटानंतर, ज्यामध्ये शेकडो निष्पाप लोकांचा बळी गेला, दाऊदने आपला तळ दुबईहून पाकिस्तानातील कराचीमध्ये हलवला. भारतीय तपास यंत्रणांनी वारंवार दावे केले आहेत की, पाकिस्तानने दहशतवाद्यांना नेहमीच सुरक्षित आश्रय दिला आहे. तेव्हापासून दाऊद कराचीमध्येच स्थायिक असल्याचे मानले जाते. जरी इस्लामाबादने नेहमीच दाऊद आपल्या देशात असल्याचा इन्कार केला असला, तरी आंतरराष्ट्रीय नोंदी मात्र वेगळीच कथा सांगतात.
ऑगस्ट 2020 मध्ये 'फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्स'च्या (FATF) दबावाखाली आल्यानंतर पाकिस्तानने स्वतः संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने प्रतिबंधित केलेल्या व्यक्तींच्या यादीत दाऊदचे नाव समाविष्ट केले होते. यामध्ये त्याचे कराचीमधील पत्ते आणि टोपणनावांचा स्पष्ट उल्लेख होता. विशेष म्हणजे 2025 पर्यंतच्या कागदपत्रांमध्येही या पत्त्यांची पुष्टी होत असल्याचे समोर आले आहे.
( नक्की वाचा : कोण होता रहमान डकैत? Dhurandhar मध्ये Akshaye Khanna ने साकारलीय भूमिका, स्वत:च्या आईचीच केली होती हत्या )
जागतिक दहशतवादी आणि काळी कृत्ये
दाऊद इब्राहिमचे कनेक्शन केवळ गुन्हेगारी जगापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्याचे संबंध अल-कायदा आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या धोकादायक दहशतवादी संघटनांशी असल्याचे पुरावे मिळाले आहेत. अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी 2003 मध्ये अमेरिकेने त्याला 'जागतिक दहशतवादी' म्हणून घोषित केले. आजही संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या यादीत त्याचे नाव कायम आहे.
3 दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी, दाऊद इब्राहिम जिवंत असल्याचे मानले जाते. 'धुरंधर 2' मुळे हा विषय पुन्हा चर्चेत आल्याने, मुंबईच्या गुन्हेगारी जगाचा हा काळा अध्याय आणि न्यायाची प्रदीर्घ प्रतीक्षा कधी संपणार, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनाला या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा पडला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world