Dombivli News: लग्नाआधी चक्क 50 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करून ऐनवेळी विवाह मोडल्याचा एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार डोंबिवलीत उघड झाला आहे. एका सुशिक्षित महिला डॉक्टरला अशा प्रकारे हुंड्यासाठी मानसिक त्रास देत सामाजिक बदनामीला सामोरे जावे लागल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यासह वेगवेगळ्या कलमांखाली वरासह त्याच्या कुटुंबातील 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
डोंबिवलीतील आयरे गाव परिसरात राहणाऱ्या 29 वर्षीय पीडित महिला डॉक्टरने या संदर्भात पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार नोंदवली आहे. पीडित तरुणीचा विवाह ठरल्यानंतर 20 जून 2026 रोजी कर्जत येथील शिल्प रिसॉर्टमध्ये साखरपुडा आणि हळदी समारंभाचे मोठे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही बाजूचे नातेवाईक अतिशय उत्साहात या सोहळ्यासाठी एकत्र आले होते.
दुपारी 12 ते 2 या वेळेत साखरपुड्याचा कार्यक्रम अतिशय सुरळीत आणि आनंदात पार पडला. मात्र, त्यानंतर मुलाकडच्यांनी आपले खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली आणि परिस्थिती अचानक बदलली. तक्रारीनुसार, वर अंकुर असवले याच्यावतीने त्याच्या मावशीने लग्न पुढे नेण्यासाठी 50 लाख रुपये रोख हुंडा देण्याची थेट मागणी वधूपक्षाकडे केली. वधूपक्षाने इतकी मोठी रक्कम तत्काळ देणे शक्य नसल्याचे हताशपणे सांगितले.
(नक्की वाचा : Pune News : आधी पासपोर्ट चोरीला, मग लोहगडावर नेलं..केतनच्या वडिलांनी सांगितलं सियानं कसं केलं होतं हत्येचं प्लॅनिंग)
नातेवाईकांसमोर शिवीगाळ आणि धमक्या
हुंड्याची रक्कम देण्यास असमर्थता दर्शवताच आरोपींनी वधू आणि तिच्या कुटुंबीयांना सर्वांसमोर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी धमक्या देत विवाह मोडत असल्याचे जाहीर केले. भर कार्यक्रमात आणि उपस्थित सर्व नातेवाईकांसमोर अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वधूपक्षाची मोठी मानहानी झाली, तसेच मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला.
या छळवणुकीनंतर पीडित महिला डॉक्टरने न्यू पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी 23 जून रोजी गुन्हा नोंदवला असून भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील संबंधित कलमे तसेच हुंडाबंदी कायदा 1961 अंतर्गत कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
( नक्की वाचा : School Teacher: शिक्षिकेचे विद्यार्थ्याशी संबंध, VIDEO हाती लागताच मुलांनी ब्लॅकमेल करून मागितली एकच गोष्ट )
या प्रकरणातील आरोपींमध्ये वर अंकुर असवले, त्याची बहीण गायत्री असवले, मोठी बहीण डेझी असवले, वडील अशोक लक्ष्मण असवले आणि आई अश्विनी असवले यांच्यासह मावशीचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून समारंभस्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी करून आरोपींना लवकरच समन्स बजावण्यात येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world