अमजद खान
पावसाळा बऱ्या पैकी लांबला आहे. त्यामुळे एकीकडे लोक उकाड्याने हैराण आहेत. तर दुसरीकडे पाण्याची टंचाई अनेक भागात जाणवत आहेत. त्यामुळे मिळेल त्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तर कुणी टँकरच्या पाण्याचा वापर करत आहे. कल्याण डोंबिवलीत तर पाणी टंचाई ही नित्याचीच झाली आहे. त्यात ही डोंबिवली पश्चिमेला असलेल्या साई नगर परिसरातली स्थिती सर्वाधिक भीषण म्हणावी लागेल. इथं एक दोन नाही तर तिन महिन्यापासून पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही कुठे डोंगरात राहतो की महापालिकेत राहतो अशी म्हणण्याची वेळ इथल्या नागरिकांवर आली आहे. त्यांनी आपला संताप बोलून दाखवला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील साई नगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध अखेर सुटला आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे परिसरातील महिलांनी संताप व्यक्त केला आहे. शेवटी शेकडो महिलांनी एकत्र येत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 'ह' प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी त्यांनी डोक्यावर रिकामे हंडे घेत महापालिकेच्या कार्यालयावर हल्ला बोल केला. हातात बोर्ड डोक्यावर रिकामे हंडे, आणि घोषणांनी या महिलांनी महापालिकेचे कार्यलय दणाणून सोडले होते.
महिलांच्या शिष्टमंडळाने यावेळी तेथील अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी या अधिकाऱ्याला महिलांनी चांगलेच धारेवर धरले. तिन महिने महापालिका काय करत होती असा जाब त्यांनी संबंधी अधिकाऱ्याला विचारला. वारंवार तक्रारी केल्या. तरी महापालिका प्रशासन निवांत होतं. त्यांना नागरिकांचं काही पडलं आहे की नाही असा सवाल ही त्यांनी यावेळी केला. ऐन उन्हाळ्यात हक्काचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. पाणी येत नाही तरी ही तुम्ही पाणीपट्टी घेणार की नाही असा प्रश्न ही काही महिलांनी केला आहे. आमच्याच साईनगरवर अन्याय का अशी विचारणा ही या निमित्ताने महिलांनी केली. यावेळी महिला अधिकाऱ्या समोर भलत्याच आक्रमक झाल्या होत्या.
त्यांचा आक्रमक पणा पाहून पाण्याची किती भीषण टंचाई त्या भागात असेल याची कल्पना येत होती. दैनंदिन गरजांसाठीही पाणी उपलब्ध होत नसल्याने येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. प्रशासनाच्या या उदासीन कारभाराचा निषेध करण्यासाठी आज परिसरातील शेकडो महिला डोक्यावर रिकामे हंडे घेऊन रस्त्यावर उतरल्या. 'ह' प्रभाग कार्यालयावर काढण्यात आलेल्या या हंडा मोर्चामध्ये महिलांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाणी समस्या त्वरित सोडवण्यात यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलक महिलांनी दिला आहे. अधिकाऱ्यानेही पाणी समस्या सोडवण्याचे आश्वासन तुर्तास तरी दिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world