देवा राखुंडे, प्रतिनिधी
Donkey Market In Jejuri : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा नगरीमध्ये भक्तीसागर लोटला आहे. पण या ठिकाणी गाढवांचा बाजारही भरल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. राजस्थानच्या काठेवाडी जातीच्या गाढवाला तब्बल दीड लाखाची किंमत मिळालीय.वर्षातून एकदा भरणाऱ्या या गाढवांच्या बाजारामध्ये महाराष्ट्रासह राजस्थान,कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातून गाढवे विक्रीसाठी आणली जातात आणि त्यांच्यावर बोली लावून त्यांना खरेदी केलं जातं.
दोन दिवसात हजारो गाढवांची विक्री होत असते.पौष पार्णिमेनिमित्त राज्यभरातील भटक्या विमुक्त समाजातील अनेक बांधव जेजुरीत कुलधर्म कुलाचारासाठी येत असतात,पूर्वी याचदिवशी जात पंचायत देखील भरायची. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकं इथे येत असतात. अशावेळी कामासाठी लागणाऱ्या गाढवांचे खरेदी विक्री देखील मोठ्या प्रमाणात होत असे.मात्र जातपंचायत घेण्यावर शासनाने निर्बंध आणलेले आहेत आणि त्यामुळे गाढवांच्या बाजाराला देखील काहीशी उतरती कळा लागली आहे.
या बाजारात होते शेकडो गाढवांची विक्री
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जेजुरी येथील या बाजारात विविध व्यापारी शेकडोच्या संख्येत आपली गाढवे घेऊन विक्रीसाठी येत असतात. या ठिकाणी 60 ते 70 हजार रुपयांपासून गाढवांना अगदी दीड लाखापर्यंतचा बाजारभाव मिळतो. या गाढवांच्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत असते. यावर्षीही हा बाजार भरला होता आणि यामध्ये अगदी साठ हजारापासून ते दीड लाख रुपयापर्यंत किमतीने गाढवांची विक्री झाली आहे.
नक्की वाचा >> Border 2 : 'घर कब आओगे' लॉन्च इव्हेंटमध्ये अहान शेट्टी भडकला? BSF जवानांसोबत केलं असं काही..व्हिडीओ व्हायरल
व्यापारी सांगतात की, गेल्या पाच पिढ्यापासून गाढवांचा व्यापार आम्ही करतो,आता 80 हजारापासून दीड लाख रुपयापर्यंत गाढवांच्या किमती आहेत.प्रामुख्यानं गाढवाचा उपयोग उद्योगधंद्यासाठी पूजाच्या कामासाठी केला जातो.काही अंशी गाढवाच्या दुधाची ही विक्री केली जाते त्यासाठीही त्याचा वापर होतो. त्यामुळे वीट भट्टी वाल्या व्यवसायिकांकडून गाढवांना मोठी मागणी असते.बाजारात गावरान जातीचे गाढव याशिवाय काठेवाडी जातीचे गाढव याला विशेष मागणी आहे.
नक्की वाचा >> Trending Video: 30 मीटर लांब सापावर चढली अन् भन्नाट नाचली, प्रसिद्ध गायिकेसाठी खर्च केले तब्बल 200 कोटी
गाढवाच्या दातांवरून त्याची किंमत ठरले
काठेवाडी जातीच्या गाढवाला 70 हजारापासून दीड लाखापर्यंत ची किंमत आहे.गाढवाचे दात पाहून दुवान चौहाण कोरा अशी प्रत ठरवली जाते.शिवाय त्याच्या वयावरूनही त्याची किंमत ठरते असं व्यापारी सांगतात. व्यापाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुजरातच्या राजकोट मधून ही गाढवे खरेदी केली जातात आणि त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख बाजारात त्याची विक्री केली जाते. त्यामध्ये जेजुरीचा बाजार विशेष असतो.जो वर्षातून एकदा पौष शुद्ध पौर्णिमेला भरतो.जेजुरी व्यतिरिक्त कानिफनाथ येथील मढी माळेगाव या ठिकाणी गाढवांचा बाजार भरतो. महाराष्ट्र व्यतिरिक्त गुजरात मधील आवट्या ला ही दीपावली वेळेस बाजार असतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world