नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात आज अचानक जोरदार आवाजासह जमिनीला हादरे बसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. भूकंपाचे धक्के बसल्याची चर्चा नाशिककरांमध्ये होती, तर काही जण विमान अपघात झाल्याचा दावा करत होते. नाशिककरांमध्ये असलेला हा संभ्रम नाशिक पोलिसांना दूर केला आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आवाज भूकंपाचा नसून, सुखोई या लढाऊ विमानामुळे झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांना कोणताही धोका नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
(नक्की वाचा- Parbhani News : भूकंप, ज्वालामुखी की आणखी काही, परभणीतल्या शेतातून वाफ येण्याचं कारण समजलं!)
नाशिकच्या ओझर येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीचा लढाऊ विमानांचा कारखाना आहे. या कारखान्यात सुखोई ही विमाने तयार होतात आणि त्यांचा नियमित सराव सुरू असतो. याच सरावादरम्यान, हे सुखोई विमान जमिनीच्या खूप जवळून गेल्याने आवाजाचा दाब निर्माण झाला. या दाबामुळेच दिंडोरी तालुक्यात सुमारे 25 किलोमीटर परिसरातील अनेक घरांना मोठे हादरे बसले आणि घरांच्या काचा देखील फुटल्या.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
या घटनेनंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी तातडीने या घटनेची माहिती घेतली आणि नागरिकांना घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट केले. हा आवाज भूकंपाचा नसून, फक्त सुखोई विमानामुळे झाला आहे.
(नक्की वाचा- 13 व्या मजल्याच्या बाल्कनीबाहेर लटकताना दिसली दोन मुलं; Video पाहून हृदयाचा ठोका चुकेल)
नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या या माहितीमुळे नागरिकांची भीती कमी झाली आहे. त्यांनी पुन्हा असे हादरे बसल्यास घाबरून न जाता, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे या भागातील नागरिक सावध झाले असले, तरी वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.