Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. याशिवाय त्यांच्याकडून होत असलेली सततची वादग्रस्त वक्तव्ये यामुळे त्यांचं मंत्रिपद धोक्यात आलं आहे. माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करण्यासाठी पक्षांर्गत हालचाली सुरू झाल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पक्षाची आणि सरकारची संभाव्य बदनामी टाळण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून ते अन्य कॅबिनेट मंत्र्याकडे देण्याचा विचार सध्या सुरू आहे. या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून दत्तात्रय भरणे आणि मकरंद पाटील या दोन नावांवर प्रामुख्याने विचार केला जात आहे. दत्ता भरणे हे सध्या क्रीडा खात्याचे मंत्री आहेत, तर मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन मंत्रालय आहे.
(नक्की वाचा - Kalyan News: वाह रे अधिकारी! एकाच दिवशी KDMCचे 3 अधिकारी ACBच्या जाळ्यात))
या महत्त्वाच्या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यात पुढील ४८ तासांत चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या संदर्भात चर्चा करतील. या सर्व चर्चेअंती, पुढील आठवड्यात माणिकराव कोकाटे यांच्या कृषी खात्याच्या भवितव्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दत्ता भरणे आणि मकरंद पाटील यांची नावे चर्चेत का?
कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि त्यांच्यावर होत असलेल्या टीकेमुळे पक्ष आणि सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये, हाच या बदलामागे मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. दत्ता भरणे हे अजित पवारांचे खास मर्जीतील मानले जातात आणि ते इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना कृषी खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी दिल्यास, अजित पवारांचा ग्रामीण भागातील प्रभाव आणखी वाढू शकतो. दुसरीकडे, मकरंद पाटील हे सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनाही पक्षश्रेष्ठींचा विश्वासू मानले जाते.