
स्वतःच्या हक्काचे घर असावे असं सर्वांनाच वाटते. त्यात मुंबई पुण्या सारख्या शहरात घराचं स्वप्न तर प्रत्येकाचेच असते. पण सध्या मुंबईबरोबरच पुण्यातील घरांच्या किंमती पाहात त्या सर्व सामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे घर घेण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहात आहे. पण आता अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी म्हाडाच्या पुणे मंडळाने मोठी संधी उपलब्ध केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तळेगाव दाभाडे येथे एकूण 269 घरांची विक्री 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर जाहीर करण्यात आली आहे. याची जाहिरात 10 ऑक्टोबर 2025 ला प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवाय अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या या घरांचे एकूण क्षेत्रफळ 48.96 चौ. मी. आहे. तर चटई क्षेत्रफळ 30.67 चौ. मी. आहे. या घरांची मूळ किंमत 20 लाख 46 हजार 882 रुपये इतकी आहे. मात्र, केंद्र शासनाकडून 1,50,000 रुपये आणि राज्य शासनाकडून 1,00,000 रुपये असे एकूण 2,50,000 रुपयांचे अनुदान मिळाल्यानंतर अर्जदारास केवळ 17 लाख 96 हजार 882 रुपये भरावे लागणार आहेत. भुईभाडे आणि इतर करांसह अंतिम किंमत 18 लाख 15 हजार 507 रुपये असेल.
नक्की वाचा - Pune News: धक्कादायक! राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये रॅगिंग? कॅडेटसोबत भयंकर घडलं
एकूण 269 घरांपैकी 200 घरे सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. उर्वरित घरांचे वाटप आरक्षित प्रवर्गासाठी खालीलप्रमाणे आहेत.
- प्रवर्ग घरांची संख्या
- अनुसूचित जाती 29
- अनुसूचित जमाती 29
- भटक्या जमाती 5
- विमुक्त जाती 6
अर्ज प्रक्रिया पुढील प्रमाणे
अर्ज विक्रीची प्रक्रिया 10 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली आहे. ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. अर्ज पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ, गृह निर्माण भवन, आगरकर रोड, पुणे येथे उपलब्ध आहेत. अर्जाची किंमत 600 रुपये त्याच बरोबर 108 रुपये GST इतकी आहे. अर्जासोबत भरावी लागणारी अनामत रक्कम 1 लाख 79 हजार 688 रुपये आहे. अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त नसावे. त्यांच्या कुटुंबाच्या नावावर भारतात कुठेही पक्के घर नसावे, या प्रमुख अटी आहेत.
नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल
पात्रतेच्या अटी
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- अर्जदाराच्या कुटुंबाच्या नावावर देशात कुठेही पक्के घर नसावे.
- प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक 3 मध्ये नोंदणी आवश्यक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world