राहुल कुलकर्णी, पुणे
पाऊस सुरु झाला की पुणेकरांसह अनेकांच्या वाटा ताम्हिणी परिसराकडे वळतात. अनेकांना आता यासाठी प्लानिंग देखील सुरु केलं असेल. मात्र या सर्वांची निराशा होणार आहे. कारण ताम्हिणी परिसरात पर्यंटकांना संप्टेंबरपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाने हा निर्णय घेतला आहे.
ताम्हिणी इथल्या मिल्की बार धबधब्यामध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वन विभागाने संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेत पर्यटकांना ताम्हिणी अभयारण्यात सप्टेंबर अखेरपर्यंत प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.
(नक्की वाचा - लोणावळ्यात एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले; दोघांचा मृत्यू, 3 जणांचा शोध सुरु)
ताम्हिणी वन्यजीव अभयारण्यातील प्लस व्हॅलीमध्ये पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटांवर अपघातांचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर वन्यजीव विभागामार्फत सदर निसर्गवाटा 28 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आल्या आहेत.ताम्हिणी परिसरात पावसाळ्यात निसर्ग आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते.
(नक्की वाचा- लोकसभा निवडणूक होणार? अर्जुनाचं उदाहरण दिलं, पुढचं लक्ष्य काय तेच पवारांनी सांगितलं)
प्लस व्हॅलीतील मिल्की बारसारख्या धबधब्यातील कुंडामध्ये पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्लस व्हॅलीमध्ये जाणाऱ्या सर्व पायवाटांचे प्रवेश प्रतिबंधित करण्यात आले आहेत. प्रवेशबंदी असल्याने अवैधरीत्या अभयारण्यामध्ये प्रवेश करता येणार नाही, असं देखील वन विभागाने स्पष्ट केलं आहे.