
अविनाश पवार, पुणे
Pune News : पुण्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या मुख्य अभियंता तथा अप्पर आयुक्त कार्यालयासमोर जनशक्ती शेतकरी संघटनेने आक्रमक आंदोलन छेडले आहे. आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांनी अंगावर ऑईल ओतून घेत, आत्मदहनाचा इशारा देत आंदोलन तीव्र केले. करकंब (पंढरपूर) येथील शेतकरी अतुल खुपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून, जलसंधारण विभागातील अधिकारी आणि ठेकेदार यांनी १४ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
काय आहे आरोप?
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाझर तलावाचे काम 8 कोटी रुपयांचे होते. मात्र जलसंधारण विभागाने ठेकेदाराला 14 कोटी रुपये देऊन मोठा भ्रष्टाचार केला. यासंदर्भात माहिती मागूनही कोणतीही माहिती न दिल्याने शेतकरी पुण्यात दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा देत आक्रमक भूमिक घेतली.
जनशक्ती शेतकरी संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, उद्यापर्यंत ठोस निर्णय न झाल्यास विधानभवनापर्यंत मोर्चा नेण्यात येईल. आवश्यकता भासल्यास विधानभवनात घुसण्याचाही प्रयत्न केला जाईल.
शेतकऱ्यांची मागणी काय?
शेतकऱ्यांनी दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापुढे हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय शेतकरी संघटनेने घेतला आहे.