जाहिरात

FDA Recruitment: राज्यात लवकरच 'FDA' अधिकाऱ्यांची भरती; भेसळ रोखण्यासाठी नवीन प्रयोगशाळा उभारणार

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या कारभाराला अधिक बळकटी देण्यासाठी रिक्त पदे भरली जाणार असून अत्याधुनिक प्रयोगशाळांची उभारणी केली जाईल, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत केली.

FDA Recruitment: राज्यात लवकरच 'FDA' अधिकाऱ्यांची भरती; भेसळ रोखण्यासाठी नवीन प्रयोगशाळा उभारणार

FDA Recruitment: राज्यातील अन्न व औषधांमधील भेसळ रोखण्यासाठी आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचा कारभार अधिक लोकाभिमुख आणि कडक करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी आणि औषध निरीक्षकांची रिक्त पदे लवकरच भरली जातील. तसेच राज्यात अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारल्या जातील, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी बुधवारी विधानसभेत केली.

11.93 कोटींचा भेसळयुक्त माल जप्त

मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहाला माहिती दिली की, दूध, दुग्धजन्य पदार्थ, पिण्याचे पाणी, गूळ, शेंगदाणे, चहा पावडर, खाद्यतेल, गुटखा, तंबाखू, सुगंधित सुपारी आणि मावा यांसारख्या भेसळयुक्त पदार्थांवर सातत्याने छापे टाकले जात आहेत. या विशेष मोहिमेत आतापर्यंत सुमारे 11.93 कोटी रुपये किमतीचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे. केवळ अन्नपदार्थच नव्हे, तर निकृष्ट दर्जाच्या सर्जिकल ग्लोव्हज संदर्भातही मोठी कारवाई करण्यात आली असून, त्यामध्ये 74.85 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांना धक्का! यावेळी बदली नाहीतर जबाबदारीच काढून घेतली)

मनुष्यबळाचा मोठा तुटवडा

विभागातील रिक्त पदांची गंभीर स्थिती मान्य करत मंत्र्यांनी नवीन भरती प्रक्रियेची माहिती दिली. राज्यात औषध निरीक्षकांची 200 पदे मंजूर असताना सध्या प्रत्यक्षात केवळ 41 अधिकारी कार्यरत आहेत. केंद्र सरकारच्या निकषांनुसार महाराष्ट्रात सुमारे 1100 अन्न सुरक्षा अधिकारी आणि 400 औषध निरीक्षकांची आवश्यकता आहे.

MPSC कडे पाठपुरावा 

अन्न व औषध प्रशासन विभागातील ही रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तसेच, विभागाच्या बळकटीकरणासाठी नवीन आकृतिबंधाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

(नक्की वाचा-  Pune Lohagad Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, तिसऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात)

3 ते 6 महिन्यांत 4 नवीन प्रयोगशाळा

अन्न आणि औषध नमुन्यांची तपासणी जलद गतीने व्हावी, यासाठी शासनाने पीपीपी तत्त्वावर 22 मान्यताप्राप्त प्रयोगशाळांशी सामंजस्य करार केला आहे. यामुळे तपासणी अहवाल मिळण्याचा कालावधी 90 दिवसांवरून थेट 30 ते 35 दिवसांवर आला आहे. याशिवाय, पुढील 3 ते 6 महिन्यांत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, रायगड या ठिकाणी नवीन शासकीय प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. तसेच प्रयोगशाळांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडे 27.30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री झिरवाळ यांनी दिली. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com