
Pune News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 12 व्या स्मृतिदिनानिमित्त हजर राहणाऱ्या माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांना धमकी मिळाल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे पुण्यात साने गुरुजी स्मारक येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. दाभोलकर ग्रंथमालेतील पाच पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यात माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर, लेखक शरद बाविस्कर आणि शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
(नक्की वाचा- Pune News: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव बदललं, महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय)
या कार्यक्रमात बोलताना मीरा बोरवणकर यांनी त्यांच्यावर आलेल्या राजकीय दबावाचा खुलासा केला. "राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम झाला आहे", अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, "मी या कार्यक्रमाला का जात आहे, म्हणून मला धमकीचा ई-मेल आला होता". त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, मिलिंद देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
(नक्की वाचा- Cotton Farmer: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंतेत वाढ)
निवृत्त झाल्यानंतरही पोलीस अधिकाऱ्यांवर असा दबाव येत असेल, तर कार्यरत अधिकाऱ्यांवर कशाप्रकारे दबाव येत असेल, असा प्रश्न बोरवणकर यांच्या आरोपाने निर्माण झाला आहे. या घटनेमुळे अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर होणारा हल्ला आणि राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world