
अनंत चतुर्दशी निमित्त गणेश मूर्ती विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. याबद्दल मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. मुंबईतील समुद्रकिनारे तसेच नैसर्गिक स्थळं आणि 290 पेक्षा अधिक कृत्रिम तलावांच्या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाकडून विसर्जनासाठी अचूक नियोजन करण्यात आले होते. मुंबई पोलीस दलासह अन्य शासकीय, निमशासकीय यंत्रणांचे सहकार्य तसेच सर्व सार्वजनिक मंडळे, श्रीगणेश भक्त आणि नागरिक यांची साथ यामुळे अनंत चतुर्दशी निमित्त श्रीगणेश मूर्ती विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला आहे. उच्च न्यायालय यांनी दिलेले निर्देश, महाराष्ट्र शासनाच्या सूचना, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची मार्गदर्शक तत्वे याअनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाकडून सार्वजनिक श्रीगणेशोत्सव 2025 संदर्भात योग्य नियोजन आखून सर्व तयारी करण्यात आली होती. या तयारीला सर्व सार्वजनिक मंडळाकडून, श्रीगणेश भक्तांकडून प्रतिसाद लाभावा, यासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली होती.
रविवारी 7 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, यंदा गणेशोत्सवात एकूण 1 लाख 97 हजार 114 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. यामध्ये 1 लाख 81 हजार 375 घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. तर 10 हजार 148 सार्वजनिक गणेशमूर्ती तसेच गौरी आणि हरतालिका मिळून 5 हजार 591 मूर्ती समाविष्ट आहेत. महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांचे फलित म्हणजे मुंबईतील श्रीगणेशभक्तांनी पर्यावरणपूरकतेचा अंगीकार करत कृत्रिम तलावांत मूर्ती विसर्जनाला सर्वाधिक प्राधान्य दिले. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तडॉ. अमित सैनी, उप आयुक्त आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवात नागरिकांना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या.
गणेशमूर्ती विसर्जन सोहळ्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, कामगार मिळून सुमारे 10 हजार मनुष्यबळ अविरतपणे कार्यरत होते. 70 नैसर्गिक स्थळं व सुमारे 290 पेक्षा अधिक कृत्रिम तलाव, छोट्या मूर्ती विसर्जनासाठी 66 जर्मन तराफे, चौपाट्यांवर वाहने अडकू नयेत म्हणून 1200 हून अधिक स्टील प्लेट, 2 हजार 178 जीवरक्षक, 56 मोटरबोटी, 594 निर्माल्य कलश आणि 307 निर्माल्य वाहने, विभागीय समन्वयासाठी 245 नियंत्रण कक्ष, सुरक्षा देखरेखीसाठी 129 निरीक्षण मनोरे, विसर्जनस्थळी 42 क्रेन, 287 स्वागत कक्ष, 236 प्रथमोपचार केंद्र व 115 रुग्णवाहिका सेवेत होत्या. रात्रीच्या विसर्जनासाठी 6 हजार 188 प्रखर प्रकाशझोताचे दिवे (फ्लडलाईट्स) व 138 शोधकार्यासाठीचे दिवे (सर्चलाईट्स), 197 तात्पुरती शौचालये, आपत्कालीन तयारीसाठी अग्निशमन दलाचे वाहन आदी सोयी-सुविधा अखंडपणे पुरवल्या होत्या.
दिवसनिहाय श्रीगणेशमूर्ती विसर्जन
- दीड दिवस - 60 हजार 434
- पाच दिवस - 40 हजार 230
- सात दिवस - 59 हजार 704
- अकरा दिवस - 36 हजार 746
- एकूण - 1 लाख 97 हजार 114
अकराव्या दिवशी विसर्जन झालेल्या एकूण श्रीगणेशमूर्ती
दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आकडेवारी
- सार्वजनिक - 5 हजार 937
- घरगुती - 30 हजार 490
- हरतालिका / गौरी - 319
- एकूण - 36 हजार 746
- अकरा दिवसांत गौरी आणि हरतालिका मिळून 5 हजार 591 मूर्ती विसर्जित
गणेशोत्सवादरम्यान 508 मेट्रिक टन निर्माल्य संकलित-
मुंबईतील श्रीगणेशोत्सवादरम्यान निर्माल्यांचे संकलन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. सार्वजनिक मंडळांकडून योग्यप्रकारे निर्माल्य संकलित केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. मुंबईतील विविध विसर्जनस्थळी एकूण 594 निर्माल्य कलश आणि 307 निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याद्वारे एकूण 508 मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world