
Ganpati Visarjan 2025 Security: गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शहरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आलीय. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विसर्जनाच्या वेळी भाविकांची गर्दी विचारात घेऊन बंदोबस्ताची मोठी तयारी करण्यात आली आहे.
शहरात 6,600 सार्वजनिक गणेश मंडळे आणि 1.5 लाख घरगुती गणपती आहेत, ज्यांचे विसर्जन शनिवारी (6 सप्टेंबर) होणार आहे. या मोठ्या संख्येमुळे 12 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 40 पोलीस उपायुक्त, 3,000 पोलीस अधिकारी आणि 18,000 पोलीस कर्मचारी तैनात केले जातील. यासह राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) 14 तुकड्या आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CRPF) 4 तुकड्या (प्रत्येक तुकडीत 120 जवान) असतील, ज्यापैकी एका तुकडीत केवळ महिलांचा समावेश आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) आणि शीघ्र कृती दल (QRT) देखील सज्ज ठेवण्यात आले आहे.
10 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
संपूर्ण शहरावर 10,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जाईल. याशिवाय 50 पेक्षा जास्त ड्रोन शहरातील विविध विसर्जन स्थळांवरील गर्दीवर लक्ष ठेवतील, ज्यामुळे आवश्यकतेनुसार कृती योजना तयार करता येईल. शहरात 400 गस्ती वाहने देखील सतत फिरत राहतील.
(नक्की वाचा: Ganpati Visarjan 2025: गणपती विसर्जनादिवशी उत्तरपूजा कशी करावी? कसा द्यावा बाप्पाला निरोप)
वाहतूक व्यवस्थापनासाठी मोठी फौज
वाहतूक विभागाचे संयुक्त आयुक्त अनिल कुंभार यांनी सांगितले की, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 4 पोलीस उपायुक्त, 8 सहायक पोलीस आयुक्त, 60 पोलीस निरीक्षक, 179 सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच 2,826 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांना महाराष्ट्र सुरक्षा बलाचे 275 कर्मचारी आणि अनिरुद्ध बापूंच्या स्वयंसेवी संस्थेचे 340 स्वयंसेवक मदत करतील. रस्त्यावर खराब झालेल्या गाड्या लगेच बाजूला करण्यासाठी 54 क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.
वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी 52 निरीक्षण मनोरे उभारले आहेत आणि विसर्जन स्थळांवर 538 जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत.
(नक्की वाचा: Pune News : पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल, गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील 15 रस्ते बंद)
एआय (AI) तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे
शहरातील अनेक कॅमेरे एआय (AI) प्रणालीशी जोडले आहेत, जे अधिक प्रभावीपणे काम करतील
हॉटस्पॉट विश्लेषण: कॅमेरे एखाद्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी जमा झाल्यास पोलिसांना तत्काळ सूचना देतील.
पादचारी विश्लेषण: गर्दीचा अचूक आकडा सांगतील, ज्यामुळे योग्य प्रमाणात पोलीस बळ तैनात करता येईल.
दृश्यमानता: हे कॅमेरे केवळ नागरिकांवरच नव्हे, तर पोलीस आणि मंडळांच्या स्वयंसेवकांवरही लक्ष ठेवतील. कोणत्याही ठिकाणी पोलीस किंवा स्वयंसेवक नसतील, तर कॅमेरे तात्काळ पोलिसांना कळवतील.

Photo Credit: PTI
चेहरा ओळख: गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या कॅमेऱ्यांमध्ये महाराष्ट्र, शेजारची राज्ये आणि दिल्ली एनसीआरमधील गुन्हेगारांचा डेटाबेस फीड करण्यात आला आहे.
वर्तन बदल: कॅमेरे रांगेतील लोकांच्या वर्तनातील बदल ओळखतील. जर कोणाची तब्येत अचानक बिघडली, चोरी झाली किंवा कोणत्याही कारणाने रांग विस्कळीत झाली, तर कॅमेरा तत्काळ पोलिसांना ठिकाणासह सूचित करेल.
अनिल कुंभार यांनी असेही सांगितले की, शहरातील 12 पूल खराब अवस्थेत असल्यामुळे, त्या पुलांवरून जड वाहनांना जाण्यास किंवा जास्त वेळ थांबण्यास मनाई करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world