
रेवती हिंगवे, पुणे
डान्सर गौतमी पाटील हिच्या गाडीला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ भीषण अपघात झाला. गौतमी पाटील हिच्या वाहनाने एका उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली, ज्यामुळे रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून रिक्षाचालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सिंहगड रोड पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ एका हॉटेलसमोर हा अपघात झाला. हॉटेलच्या समोर एक रिक्षा उभी होता. गौतमी पाटीलच्या भरधाव वेगातील वाहनाने याच उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात रिक्षाचालकासोबतच रिक्षातील दोन प्रवासीही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गौतमी पाटील गाडीत नव्हती
अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी गौतमी पाटील ही तिच्या वाहनात उपस्थित नव्हती. तिचा चालक वाहन चालवत होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गौतमी पाटीलच्या वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे.
सिंहगड रोड पोलीस या संपूर्ण घटनेची नोंद घेऊन अधिक तपास करत आहेत. अपघाताचे नेमके कारण काय होते? चालकाचा निष्काळजीपणा होता की अन्य काही तांत्रिक कारण, याचा तपास पोलीस करत आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world