
महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी जगभरात रोजगाराची द्वारे खुली व्हावी, या उद्देशाने कौशल्य विकास विभाग काम करत आहे. या दृष्टीनेच कौशल्य विभागाच्या वतीने सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जागतिक कौशल्य केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आज कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरचे वाणिज्यदूत ओंग मिंग फुंग यांनी मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यास लवकरच महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाच्या ट्रेड्सचे प्रशिक्षण सुरू करण्यात येईल असे यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिंगापूरचे वाणिज्य दूत ओंग मिंग फुंग यांची सहमती
सिंगापूरचे वाणिज्य दूत ओंग मिंग फुंग यांनी या बैठकीत राज्यातल्या विविध भागात सुरू असलेल्या व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाची माहिती घेतली. कौशल्य विभागाच्या वतीने सुरू असलेल्या केंद्राबाबत फुंग यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यासंदर्भात सहमती दर्शवली आहे. या बैठकीला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख, कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनावणे आणि मुख्यमंत्रीयांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे या बैठकीला उपस्थित होते.
युवकांना बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रकल्पात प्रशिक्षणाची संधी
जगभरातल्या उद्योगात आवश्यक असलेल्या कौशल्य अभ्यासक्रमाचा सिंगापूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन सर्व्हिसेस ( ITEES ) या संस्थेत समावेश असतो. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष कामाची संधी, तिथले आधुनिक तंत्रज्ञान, रोबोटिक तंत्रज्ञान, AI तंत्रज्ञान तसेच औद्योगिक व्यवस्था आणि सेवा याबाबतच्या प्रशिक्षणाची संधी या उपक्रमामुळे महाराष्ट्रातल्या युवकांना मिळणार आहे.
जागतिक दर्जाच्या कौशल्य प्रशिक्षणाबाबत लवकरच सामंजस्य करार
सिंगापूरच्या जागतिक कौशल्य केंद्राच्या माध्यमाने जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना जगभरातील रोजगाराच्या संधीचे दरवाजे खुले होतात. याच अनुषंगाने महाराष्ट्रातल्या युवकांना जागतिक स्तरावर संधी निर्माण करण्याचा प्रयत्न कौशल्य विकास विभाग प्रयत्नशील आहे. सिंगापूरचे वाणिज्य दुतचे ओंग मिंग फुंग यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच याबाबतचा सामंजस्य करार करण्यात येणार आहे,असे ही मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world