मुंबई ते पुणे (Mumbai To Pune Expressway) असा नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या प्रवासातील अंतर आता आणखी कमी होणार आहे. मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गामुळे मुंबईहून पुण्याला आणि पुण्याहून मुंबईला जाणारा प्रवास सोयीचा झाला आहे. मात्र येथे वाहतूक कोंडींचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान अटल सेतूपासून थेट शीघ्र संचार द्रुतगती महामार्गामुळे आता अवघ्या दोन तासात पुणे गाठता येणार आहे.
या नव्या महामार्गामुळे मुंबई-पुणेकरांच्या सध्याच्या वेळेत सव्वा ते दीड तासांची बचत होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सुट्टीच्या दिवशी तर घाट महामार्गावर लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. ही समस्या सोडविण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून लोणावळा घाट परिसरात आणखी एक मार्गिका (मिसिंग लेन) तयार करून महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
नक्की वाचा - एक सही अन् ससूनचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात; पुण्यात 4 कोटींचा फ्रॉड, 25 जणांवर कारवाई!
या महामार्गावरील वाहनांची वाढली संख्या लक्षात घेता येत्या काळात हा महामार्गही अपुरा पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काळ्यात महामार्गाला आणखी एक पर्यायी महामार्ग बांधण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूला थेट पुणे-सातारा-सोलापूरला जोडणाऱ्या सुमारे 17 हजार कोटी रुपयांच्या नव्या शिघ्र संचार द्रुतगती महामार्गामुळे मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world